महिलांना काही धार्मिक ठिकाणांवर प्रवेश करण्यावर असलेली बंदी उठवावी या मागणीनंतर देशभरात वादळ उठल्यानंतर उत्तर प्रदेशातीत ईदगाह मैदानावर महिलांना नमाज पठणासाठी परवानगी देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. ईद-उल-फित्र निमित्त नमाजपठणासाठी महिलांना ऐशबाग ईदगाहवर इतिहासात प्रथमच स्वतंत्र व्यवस्था उपलब्ध करून देण्यात आली आहे.
रमजाननिमित्त महिलांना नमाजपठण करता यावे, यासाठी स्वतंत्र सोय करण्यात आल्याची माहिती मौलाना खालिद रशिद महाली यांनी दिली. ऐशबाग ईदगाहच्या वतीने घेण्यात आलेला हा निर्णय बदलाचे प्रतीक असून, मशिदीची दारे आता महिलांसाठी खुली झाली आहेत. त्यांना पुरुषांप्रमाणे नमाजपठण करता येणार असल्याचे महाली यांनी सांगितले.
शनीशिंगणापूर येथे असलेली प्रवेशबंदी काही दिवसांपूर्वीच न्यायालयाने उठविली आहे; तसेच मुंबईतील हाजी अली दर्ग्यात महिलांना असलेली प्रवेशबंदी उठवावी, या संदर्भात भारतीय मुस्लिम महिला आंदोलनाच्या वतीने उच्च न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे.