Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

देशातल्या 25% खासदारांवर खून, खूनाचा प्रयत्न आणि महिलांशी संबधित गुन्ह्यांचे आरोप

parliament
, गुरूवार, 14 सप्टेंबर 2023 (16:37 IST)
असोसिएशन ऑफ डेमोक्रॅटिक रिफॉर्म्स (ADR) आणि नॅशनल इलेक्शन वॉच (NEW) या संस्थांनी खासदारांच्या विरोधात दाखल करण्यात आलेल्या गुन्हेगारी प्रकरणाबाबत एक अहवाल प्रकाशित केला आहे.
 
या अहवालासाठी लोकसभा आणि राज्यसभेच्या एकूण 776 खासदारांपैकी 763 खासदारांची शपथपत्रं अभ्यासली आहेत.
 
लोकसभा किंवा राज्यसभा निवडणुकीला उमेदवारी दाखल करत असताना त्यांनी दाखल केलेल्या शपथपत्रांमधून ही आकडेवारी जाहीर करण्यात आलेली आहे.
 
या अहवालामधून भारतीय संसदेत निवडून आलेल्या खासदारांची गुन्हेगारी पार्श्वभूमी नेमकी काय आहे हे शोधण्याचा प्रयत्न केला गेला.
 
एकूण 763 खासदारांपैकी तब्बल 306 (40%) खासदारांवर फौजदारी खटले दाखल असल्याची माहिती या अहवालातून समोर आली आहे.
 
तर 194 (25%) खासदारांवर खून, खुनाचा प्रयत्न, अपहरण आणि महिलांवरील अत्याचाराचे गंभीर गुन्हे दाखल असल्याची माहिती पुढे आलीय.
 
कोणत्या राज्यांमधल्या खासदारांवर सगळ्यांत जास्त गुन्हे?
टक्केवारीचा विचार करता या यादीमध्ये लक्षद्वीप अव्वलस्थानी आहे कारण तिथून एकच खासदार निवडून येतात आणि त्यांच्यावरच फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे.
 
केरळ याबाबत दुसऱ्या स्थानावर असून त्या राज्यातून संसदेत निवडून आलेल्या 29 खासदारांपैकी 23 खासदारांवर फौजदारी गुन्हे दाखल झालेले आहेत.
 
बिहारमधल्या लोकसभा आणि राज्यसभेच्या 56 पैकी 41 खासदारांवर एकतरी फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे.
 
महाराष्ट्रातील परिस्थिती नेमकी काय आहे?
महाराष्ट्राचा विचार केल्यास महाराष्ट्रातील 65 पैकी 37 खासदारांवर फौजदारी स्वरूपाचा गुन्हा दाखल झालेला आहे. महाराष्ट्रानंतर तेलंगणा आणि दिल्ली या राज्यांचा क्रमांक लागतो.
 
महाराष्ट्रातील लोकसभा आणि राज्यभेच्या एकूण 65 खासदारांनी निवडणुकीआधी दाखल केलेल्या शपथपात्रांचा एडीआर या संस्थेने अभ्यास केला.
 
त्यामध्ये महाराष्ट्रातील 37 खासदारांनी त्यांच्यावर फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती दिलीय. तर यापैकी 22 खासदारांवर गंभीर स्वरूपातील फौजदारी गुन्हे दाखल असल्याची माहिती या शपथपत्रामध्ये देण्यात आलेली आहे.
 
महाराष्ट्रातील एका खासदारावर खुनाशी संबांधित प्रकरणामध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय.
 
तर तीन खासदारांवर खुनाचा प्रयत्न केल्याप्रकरणी गुन्हा दाखल केला गेलाय
 
शिवाय दोन खासदारांच्या विरोधात महिलांवरील अत्याचाराच्या संदर्भात गुन्हा दाखल केला गेलाय.
 
ADRने त्यांच्या वेबसाईटवर हा सविस्तर अहवाल दिला आहे. इथं क्लिक करून तुम्ही तो सविस्तर अहवाल आणि आरोप असलेल्या खासदारांची नावं पाहू शकता.
 
खून, खुनाचा प्रयत्न आणि महिलांवरील अत्याचाराची प्रकरणं
देशाच्या संसदेतील 11 खासदारांवर खुनाचा आरोप ठेवून गुन्हा दाखल करण्यात आलाय. तर 32 खासदारांवर खुनाचा प्रयत्न केल्यासंदर्भातला गुन्हा दाखल झालेला आहे.
 
एकूण 21 खासदारांनी महिलांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यांची नोंद असल्याचं मान्य केलंय तर यापैकी चार खासदारांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झालेला आहे.
 
कोणत्या पक्षातील खासदारांवर सर्वाधिक गुन्हे?
एडीआरने प्रकाशित केलेल्या या अहवालानुसार सध्या केंद्रात सत्तारूढ असणाऱ्या भाजपमध्ये फौजदारी गुन्हे दाखल असणाऱ्या खासदारांचं प्रमाण सर्वाधिक आहे.
 
भाजपच्या एकूण 385 खासदारांपैकी 36% म्हणजेच 139 खासदारांवर किमान एकतरी फौजदारी गुन्हा दाखल झालेला आहे.
 
काँग्रेसच्या एकूण 81 खासदारांपैकी 53% म्हणजेच 43 खासदारांवर गुन्हा दाखल झालेला आहे.
 
त्याखालोखाल ममता बॅनर्जींचा तृणमूल काँग्रेस पक्ष, लालू प्रसाद यादवांचा राजद, कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया (मार्क्सवादी) आम आदमी पक्ष आणि वायएसआर काँग्रेस या पक्षांचा अनुक्रमे नंबर लागतो.
 
राष्ट्रवादी काँग्रेसच्या आठपैकी तीन खासदारांवर देखील गुन्हे दाखल झालेले आहेत.
 
तर खून, खुनाचा प्रयत्न किंवा महिलांच्या विरोधात केलेल्या गुन्ह्यांचा विचार केल्यास.
 
भाजपच्या 25%, काँग्रेसच्या 32%, तृणमूल काँग्रेस पक्षाच्या 19% खासदारांवर गंभीर स्वरूपातल्या गुन्ह्यांची नोंद आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुलांना घेऊन जाणारी बोट उलटली, 18 मुले अद्याप बेपत्ता