Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अयोध्या: राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला शंकराचार्य का जाणार नाहीत?

NISHCHALANAND SARASWATi
, शुक्रवार, 12 जानेवारी 2024 (16:55 IST)
22 जानेवारी रोजी अयोध्येतील राम मंदिरातील प्राणप्रतिष्ठेची तारीख जसजशी जवळ येऊ लागली तसतसं या सोहळ्यामध्ये कोण-कोण सहभागी होणार याची चर्चा सुरू झाली.
 
गेल्या अनेक दिवसांपासून अनुत्तरीत असलेल्या प्रश्नाचं काँग्रेसने बुधवारी उत्तर दिलं.
 
निवडणुकीत राजकीय लाभ मिळवण्यासाठी भाजप राम मंदिर सोहळ्याला राजकीय स्वरूप देत असल्याचं सांगत काँग्रेसने सोहळ्याचं निमंत्रण नाकारलं.
 
काँग्रेसने एका निवेदन प्रसिद्ध करत सांगितलं की, "प्रभू श्रीराम हे आपल्या देशातील कोट्यवधी भारतीयांचं आराध्य दैवत आहेत. धर्म हा माणसाचा वैयक्तिक निर्णय आहे परंतु भाजप आणि आरएसएसने गेल्या अनेक वर्षांपासून राम मंदिर हा राजकीय मुद्दा बनवलाय. हे स्पष्ट आहे की, राजकीय लाभासाठीच एका अर्धवट निर्माण केलेल्या मंदिराचं उद्घाटन करण्याचा घाट घातला जातोय."
 
 
काँग्रेसने म्हटलं, “सर्वोच्च न्यायालयाने राम मंदिर प्रकरणी 2019 मध्ये दिलेला निर्णय आम्ही स्वीकारून लोकभावनेचा आदर ठेवून मल्लिकार्जुन खर्गे, सोनिया गांधी आणि अधीररंजन चौधरी हे भाजप आणि आरएसएसच्या या आयोजनाचं हे निमंत्रण सन्मानपूर्वक नाकारत आहोत.”
 
दुसरीकडे राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणीसुद्दा सहभागी होणार असल्याचं विश्व हिंदू परिषदेने स्पष्ट केलं आहे. काही दिवसांपूर्वी अशा बातम्या आलेल्या की अडवाणी या सोहळ्यात सहभागी होणार नाहीत.
 
आदि शंकराचार्यांनी स्थापन केलेल्या पीठांचे चार शंकराचार्य आहेत. हिंदू धर्मानुसार त्यांना श्रद्धेचे स्थान मिळालेले आहे.
 
त्यापैकी दोन शंकराचार्यांनीदेखील राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहण्याला न जाण्याचा निर्णय घेतलाय.
 
तर दुसऱ्या दोन शंकराचार्यांनी प्रसिद्धिपत्रक काढून सर्वांना या सोहळ्यात सामिल होण्याचं आवाहन केलं आहे.
 
शंकराचार्यांचं महत्त्व
धार्मिक मान्यतेनुसार, शंकराचार्य हे हिंदू धर्मातील धर्मगुरूचं सर्वोच्च पद आहे.
 
हिंदू धर्मात शंकराचार्यांकडे सन्मानाने आणि आस्थेने पाहिलं जातं.
 
आदि शंकराचार्य हे हिंदू धर्माच्या तात्विक विवेचनासाठी देखील ओळखले जातात.
 
आदि शंकराचार्यांनी हिंदू धर्माच्या प्रचार-प्रसारासाठी चार मठांची देखील स्थापना केली होती. धर्माचा प्रचार-प्रसार करणं ही या मठांची जबाबदारी होती. हे चार मठ पुढीलप्रमाणे;
 
श्रृंगेरी मठ, रामेश्वरम तामिळनाडू- शंकराचार्य भारतीतीर्थ महाराज
गोवर्धन मठ, पुरी ओडिशा- शंकराचार्य निश्चलानन्द सरस्वती महाराज
शारदा मठ, द्वारका गुजरात- शंकराचार्य सदानंद महाराज
ज्योतिर्मठ, बद्रिका उत्तराखंड- शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद महाराज
हिंदू धर्मात या मठांना अतिशय मानाचं स्थान आहे.
 
म्हणूनच राम मंदिर प्राणप्रतिष्ठा सोहळ्याची तारीख निश्चित झाल्यानंतर शंकराचार्यांचं मत जाणून घेण्याचा प्रयत्न केला गेला.
 
शंकराचार्यांनी न जाण्याचं कारण काय?
ज्योतिर्मठ शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांनी म्हटलं की, देशातील चारही शंकराचार्य 22 जानेवारी रोजी पार पडणाऱ्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सामिल होणार नाहीत.
 
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद सरस्वती यांच्या मते या सोहळ्याचं आयोजन शास्त्रानुसार केलं जात नाहीये.
 
दरम्यान श्रृंगेरी मठाच्या वतीने प्रसिद्धीपत्रक काढून सांगण्यात आलंय की, 'शंकराचार्य भारतीतीर्थ यांच्या छायाचित्रासह संदेश पाठवण्यात येत आहेत, ज्यावरून श्रृंगेरी शंकराचार्यांचा प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमाला विरोध असल्याचं भासवलं जातंय. परंतु असा कोणताही संदेश शंकराचार्यांच्या वतीने देण्यात आलेला नाही. हा प्रचार चुकीचा आहे.'
 
श्रृंगेरी शंकराचार्यांच्या वतीने प्राणप्रतिष्ठा कार्यक्रमात सहभागी होण्याचं आवाहन करण्यात आलंय.
 
परंतु शंकराचार्य जातीने या कार्यक्रमाला उपस्थित राहणार की नाही याबाबत प्रसिद्धीपत्रकात स्पष्टपणे काहीही सांगण्यात आलेलं नाही.
 
तर दुसरीकडे शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर केला जातोय.
 
या व्हिडिओमध्ये शंकराचार्य अविमुक्तेश्वर बोलताना दिसतात की, “हे मंदिर रामानंद संप्रदायाचं असेल तर चंपत राय तिथे काय करतायत? त्यांनी तिथून बाजूला व्हावं आणि सर्व सूत्र रामानंद संप्रदायाच्या हाती द्यावीत. आम्ही मोदीविरोधी नाही आहोत, परंतु आम्हाला धर्मविरोधीसुद्धा व्हायचं नाही.”
 
श्रीराम जन्मभूमी ट्रस्टचे महासचिव चंपत राय यांनी अलिकडेच राम मंदिर हे रामानंद संप्रदायाचं असल्याचं विधान केलेलं.
 
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “चारही शंकराचार्यांनी कोणताही राग अथवा द्वेषामुळे नव्हे, तर शास्त्रीय विधींचं पालन करणं आणि करवून घेणं ही शंकराचार्यांची जबाबदारी आहे. सध्या तिथे शास्त्रीय विधींची उपेक्षा होतेय. मंदिरनिर्माण अद्याप पूर्ण झालेलं नाही आणि प्राणप्रतिष्ठा केली जातेय. हे काम घाईगडबडीने करण्यासारखी कोणतीच परिस्थिती उद्भवलेली नाही. कधीकाळी तिथे रात्री जाऊन मूर्ती ठेवण्यात आलेली, ती परिस्थिती वेगळी होती. 1992 साली जेव्हा वास्तू पाडण्यात आली तेव्हा कोणताही मुहूर्त पाहिला गेला नव्हता. त्या वेळी कोणत्याही शंकराचार्यांनी प्रश्न उपस्थित केला नाही कारण त्यावेळची परिस्थितीच तशी होती.”
 
शंकराचार्य अविमुक्तेश्वरानंद म्हणाले, “आज आपल्याकडे असलेल्या संधीचा योग्यप्रकारे वापर करून मंदिराची निर्मिती करून प्राणप्रतिष्ठा केली गेली पाहिजे. आमच्या या मताला मोदीविरोधी ठरवलं जातंय. आम्ही स्वत: धर्मशास्त्रांचंच पालन करू इच्छितोय, लोकांनाही त्याच मार्गावर नेऊ पाहतोय. रामाचं अस्तित्व आम्हाला धर्मशास्त्रानेच पटवून दिलंय. ज्या शास्त्रातून आम्हाला रामाची ओळख झाली, त्याच शास्त्रानुसार प्राणप्रतिष्ठा कशी करायची हे सुद्धा आम्ही जाणतो. त्यामुळेच कोणतेही शंकराचार्य तिथे जात नाहीये.”
 
पुरीच्या गोवर्धन मठाचे शंकराचार्यांनी काय म्हणाले?
गोवर्धन मठाचे शंकराचार्य निश्चालानंद स्वामी यांनी एका वृत्तवाहिनीला सांगितलं, “प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचं निमंत्रण मिळालं तर अभिमान वाटेल आणि नाही मिळालं तर राग येईल, मी इतक्या त्रोटक मानसिकतेचा नाही. रामाची प्राणप्रतिष्ठा शास्त्रांच्या पद्धतीने होणं गरजेचं आहे. आता प्राणप्रतिष्ठा शास्त्रांच्या पद्धतीने होत नाहीये. त्यामुळे माझं तिथे जाणं योग्य नाही. मला एका व्यक्तीसोबत सहभागी होण्याचं आमंत्रण मिळालं आहे.”
 
निश्चलानंद स्वामी म्हणतात, “मूर्तीला कुणी स्पर्श करावा आणि कुणी करू नये, याबाबत खबरदारी घ्यायला हवी. पुराणात लिहिलंय की देवाची (मूर्ती) प्राणप्रतिष्ठा तेव्हाच होते, जेव्हा ती विधीप्रमाणे केली जाते. जर ती योग्य पद्धतीने केली गेली नाही तर देवता नाराज होतात. हे अजिबात विनोदी नाही. शास्त्रोक्त पद्धतीने गोष्टी केल्या गेल्या तरंच त्याचा सर्वांना फायदा होतो अन्यथा देवाचा कोप होऊ शकतो.”
 
ते म्हणाले, “मोदीजी लोकार्पण करतील, मूर्तीला स्पर्श करतील आणि मी तिथे टाळ्या वाजवून त्यांचं गुणगान गाऊ का? माझं पद हे महत्त्वाचं आहे. मला माझ्या पदाचा आदर राखला पाहिजे. मी तिथे गेलो तर मोदीजी फारफार तर मला नमस्कार करतील. अयोध्येशी माझं काहीही वाकडं नाही. अयोध्येशी माझे संबंध कायमचे जोडले गेले आहेत. मात्र या प्रसंगी तिथे जाणं योग्य नाही.”
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी प्राणप्रतिष्ठा करण्याबाबत ते म्हणतात की, “दोन वर्षांनंतरही मोदींनीच प्राणप्रतिष्ठा केली असती तरी मी हेच म्हटलं असतं की मूर्तीची प्राणप्रतिष्ठा योग्य रितीने झाली पाहिजे. अयोध्येत आता शास्त्रांचं पालन केलं जात नाहीये. बाकी काहीच कारण नाही. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाहीए. मला राग येतच नाही.”
 
 
पुरीच्या शारदापीठाच्या शंकराचार्यांकडून याबाबत सोशल मीडियावर एक निवेदन टाकण्यात आलंय.
 
यामध्ये सांगण्यात आलंय की, “शंकराचार्य सदानंद महाराज यांच्याकडून कोणतंही निवेदन प्रसिद्ध करण्यात आलेलं नाही. राम मंदिरासाठी आमच्या गुरूदेवांनी असंख्य प्रयत्न केले होते, 500 वर्षांनंतर या वादावर पडदा पडला आहे.”
 
प्राणप्रतिष्ठा सोहळा वेद, शास्त्र, धर्म आणि मर्यादेचं पालन करून झाला पाहिजे, असं निवेदनात म्हटलेलं आहे.
 
मठाचे शंकराचार्य स्वत: प्राणप्रतिष्ठा सोहळ्यात सहभागी होणार की नाही, हे देखील या निवेदनात स्पष्ट करण्यात आलेलं नाही.
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अन्नपूर्णी’ सिनेमा नेटफ्लिक्सनं हटवला, कारण...