गुजरातमधील पाटण येथील मेडिकल कॉलेजमध्ये रॅगिंगमुळे 18 वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्यानंतर पोलिसांनी 15 विद्यार्थ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला. सर्व आरोपी एमबीबीएसच्या द्वितीय वर्षाचे विद्यार्थी आहेत. त्यांनी पीडितेसह अनेक कनिष्ठ विद्यार्थ्यांना तीन तास वसतिगृहात उभे केले त्यांनतर विद्यार्थ्याला भोवळ आली आणि तो बेशुद्ध झाला. त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला.
पीडितेला तीन तास उभे करून ठेवण्यात आले होते. अनिल मेथानिया असे पीडितेचे नाव आहे. तो एमबीबीएसच्या प्रथम वर्षाचा विद्यार्थी होता.
कॉलेजच्या अँटी रॅगिंग समितीने 26 विद्यार्थ्यांचे जबाब घेतले ज्यात 11 प्रथम वर्षाचे विद्यार्थी आणि 15 द्वितीय वर्षाचे विद्यार्थी होते. यादरम्यान समितीला 15 द्वितीय वर्षाच्या विद्यार्थ्यांसह प्रथम वर्षाच्या 11 विद्यार्थ्यांनी रॅगिंग केल्याचे आढळून आले. सोमवारी मध्यरात्रीनंतर बालिसणा पोलिस ठाण्यात दाखल केलेल्या एफआयआरनुसार, शनिवारी रात्री 15 ज्येष्ठ विद्यार्थ्यांनी पीडितेसह प्रथम वर्षाच्या 11 विद्यार्थ्यांना त्यांच्या वसतिगृहाच्या खोलीत बोलावले होते. त्यांनी कनिष्ठ विद्यार्थ्यांना तीन तास उभे केले. यावेळी त्याच्यावर नाचण्यासाठी आणि गाणी गाण्यासाठी दबाव टाकण्यात आला.
वरिष्ठ विद्यार्थ्यांनी केलेल्या मानसिक आणि शारीरिक छळामुळे मयताची प्रकृती ढासळली आणि तो बेशुद्ध झाला.त्याला रुग्णालयात नेले असता त्याचा मृत्यू झाला. या प्रकरणी 15 विद्यार्थ्यांच्या विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.