मॉडेल दिव्या पाहुजा हत्याकांडात दिव्या पाहुजा हिचा मृतदेह हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहाना भागातील कुडानी हेड कॅनॉलमध्ये अडकला होता. दिव्या पाहुजाची बहीण नयना पाहुजा हिने तिच्या पाठीवर असलेल्या टॅटूवरून मृतदेह ओळखला आहे. गुरुग्राम पोलिसांचे डीसीपी क्राइम विजय कुमार यांनी याला दुजोरा दिला आहे.
दिव्याच्या मृतदेहाचा शोध घेण्यासाठी एनडीआरएफची २५ सदस्यीय टीम पटियालाला पोहोचली होती. गुरुग्राम आणि पंजाब पोलिसांसह एनडीआरएफची टीम पटियाला ते खनौरी सीमेपर्यंतच्या कालव्यात मृतदेहाचा शोध घेत होती, मात्र हरियाणाच्या फतेहाबाद जिल्ह्यातील तोहानाच्या कुडानी हेडमध्ये दिव्या पाहुजाचा मृतदेह सापडला.
कालव्यातून मृतदेह बाहेर काढल्यानंतर पोलिसांनी त्याचे फोटो दिव्याच्या कुटुंबीयांना पाठवले. चित्र पाहून दिव्याच्या बहिणीने मृतदेह ओळखला. याआधी, मुख्य आरोपी अभिजीतचा सहकारी बलराज गिल याला गुरुवारी पश्चिम बंगाल विमानतळावरून अटक करण्यात आली होती. बलराज गिल हा देश सोडून बँकॉकला जाण्याचा विचार करत होता.
2 जानेवारी रोजी मॉडेल दिव्या पाहुजाची गुरुग्राममधील सिटी पॉइंट हॉटेलच्या रूम नंबर 111 मध्ये गोळ्या झाडून हत्या करण्यात आली होती. हॉटेल मालक अभिजीत सिंग याने ही घटना घडवली होती. दिव्या पाहुजाची हत्या केल्यानंतर आरोपी अभिजीतसह हेमराज आणि हॉटेलमध्ये सफाई आणि रिसेप्शन कामगार म्हणून काम करणारे ओम प्रकाश यांनी तिचा मृतदेह त्यांच्या बीएमडब्ल्यू कारमध्ये ठेवला होता.
हे काम करण्यासाठी आरोपींनी दोन्ही कर्मचाऱ्यांना सुमारे 10 लाख रुपयांचे आमिष दाखवले होते. यानंतर आरोपी अभिजीतने त्याचे अन्य दोन साथीदार बलराज गिल आणि रवी बंगा यांना बोलावून मृतदेहाची विल्हेवाट लावण्यासाठी गाडी दिली होती .
पश्चिम बंगालमधून अटक करण्यात आलेल्या बलराज गिलची चौकशी केल्यानंतर हरियाणा पोलिसांना दिव्याचा मृतदेह सापडला. बलराजने दिव्याचा मृतदेह हरियाणाच्या तोहाना कालव्यात फेकून दिल्याचे सांगितले होते. या संपूर्ण हत्येप्रकरणी गुरुग्राम गुन्हे शाखेने सहा आरोपींची नावे दिली होती. मुख्य आरोपींमध्ये अभिजीत सिंग, हेमराज, ओम प्रकाश, मेघा, बलराज गिल आणि रवी बंगा यांचा समावेश आहे.