रविवारी जादु दाखवण्याच्या नादात हुगळी नदीत हात पाय बांधुन घेत एका काचेच्या पेटीत नदीत उतरलेल्या जादुगारचा मृतदेह अखेर सापडला असुन अशा प्रकारची धोकादायक जादू करण्याचा प्रयत्न त्या जादूगाराच्या अंगावर बेतला आहे.
कोलकात्याचे जादूगार चंचल लाहिरी हे मॅंड्रेक म्हणूनही ओळखले जायचे. रविवारी लाहिरींना एका बोटीतून हुगळी नदीच्या पाण्यात सोडण्यात आले होते. सहा कुलुप आणि साखळ्यांनी त्यांचे हातपाय बांधण्यात आले होते. दोन बोटींवर असलेल्या बघ्यांच्या समोर त्यांना नदीमध्ये सोडण्यात आले होते. पाण्याखाली स्वतःला सोडवून त्यांनी किनाऱ्यावर सुरक्षित परतणे अपेक्षित होते. मात्र, बराच काळ वाट पाहूनही ते बाहेर न आल्याने उपस्थित लोकांनी पोलिसांना याविषयीची माहिती दिली.
यानंतर कोलकाता पोलिसांनी आणि स्कूबा डायव्हर्सच्या पथकांनी हा भाग पिंजून काढला. मात्र, रविवारी त्यांचा शोध घेण्यात अपयश आल्यानंतर अखेर सोमवारी रात्री त्यांचा मृतदेह सापडला, अशी माहिती कोलकाता पोलीसचे बंदर विभागाचे उपायुक्त सयद वकार रझा यांनी सांगितली.