जवान रॉय मॅथ्यू आत्महत्या प्रकरणात पत्रकार पूनम अग्रवाल यांनी भारतीय सैन्यातील काही अधिकाऱ्यांविरोधात पोलिसांकडे ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे. यामुळे सदरच्या प्रकरणाला नवे वळण मिळाले आहे.
काही महिन्यापूर्वी देवळाली कॅम्प येथे लष्करी जवान रॉय मॅथ्यू या जवानाने आत्महत्या केली होती. स्टिंग ऑपरेशन करणारी द क्विंट न्यूज चॅनल ची दिल्ली येथील पत्रकार पूनम अग्रवाल आणि सेवानिवृत्त अधिकारी दीपचंद या दोघांवर आत्महत्येस प्रवृत्त करणे आणि ऑफिसर सिक्रेट अॅक्टचा भंग केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्यानंतर पूनमने लष्करातील काही अधिकाऱ्यांची पोलिसांत ऑनलाईन तक्रार दाखल केली आहे.
सहायक आय पदावर काम करत असलेल्या लष्करी जवान रॉय मॅथ्यू याने गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना घडली होती. याआधी अधिकाऱ्यांकडून कशाप्रकारे जवानांना घरातील कामांमध्ये अडकवले जाते, तसेच त्यांच्याकडून घरकामे, अधिकाऱ्याची मुले सांभाळणे, कुत्रे फिरवण्यास घेऊन आदी कामे कशी करून घेतली जातात. याचे स्टिंग ऑपरेशन क्विंट या वेबसाईटच्या पत्रकार असलेल्या अग्रवाल यांनी केले होते. यामध्ये रॉय मॅथ्यू याचा आवाज होता. पूनम अग्रवाल हिने याचा व्हिडीओ तयार करून सोशल मिडीयावर प्रसारित केला होता. यामुळे वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून कोर्ट मार्शल होण्याची भीती वाटल्यामुळे रॉयने आत्महत्या केल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाल्याचे पोलीसांनी सांगितले आहे. तर आता अग्रवाल यांनी तक्रार दाखल केल्यावर प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.