Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न देण्यामागचे राजकीय अर्थ काय आहेत?

lal krishna adwani
, रविवार, 4 फेब्रुवारी 2024 (17:20 IST)
भाजपचे ज्येष्ठ नेते आणि राम मंदिर आंदोलनाचे प्रणेते लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ हा देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान जाहीर करण्यात आलाय. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शनिवारी ही घोषणा केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वतः लालकृष्ण आडवाणी यांची भेट घेऊन त्यांचं अभिनंदन केलं. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर लिहिलं की भारताच्या विकासात त्यांचं अमूल्य योगदान आहे.
 
काही दिवसांपूर्वीच केंद्रातील सत्ताधारी भाजपने बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना मरणोत्तर ‘भारतरत्न’ सन्मान देण्याचा निर्णय घेतला होता.
 
‘भारतरत्न’ पुरस्कार मिळवणारे लालकृष्ण आडवाणी हे 50 वे व्यक्ती आहेत. 2014 मध्ये सत्तेत आल्यानंतर भाजपने आडवाणी एकूण सात जणांना ‘भारतरत्न’ देण्याची घोषणा केली असून त्यापैकी पाच जणांना हा पुरस्कार देण्यात आलाय.
 
लालकृष्ण आडवाणी यांना ‘भारतरत्न’ देण्याची मागणी भाजप समर्थक अनेक दिवसांपासून करत होते. अशा परिस्थितीत 2024 च्या लोकसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून हा सन्मान देण्यात आलाय का, असा प्रश्न उपस्थित केला होतोय. दहा वर्ष हातात सत्ता असूनही आत्ताच हा निर्णय का घेण्यात आला?
 
मुळात लालकृष्ण आडवाणींना ‘भारतरत्न’ देण्यामागचा अर्थ काय आहे? हे समजून घेण्यासाठी बीबीसीने ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री, विजय त्रिवेदी आणि शरद गुप्ता यांच्याशी संवाद साधला.
ही गुरुदक्षिणा आहे का?
1991 साली लालकृष्ण आडवाणी यांनी काढलेल्या सोमनाथ ते अयोध्या या रथयात्रेत गुजरात टप्प्याची तयार करण्याची जबाबदारी नरेंद्र मोदी यांच्यावर सोपविण्यात आली होती.
 
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात की, लालकृष्ण अडवाणींनी केवळ रथयात्रेदरम्यानच नव्हे तर पंतप्रधान नरेंद्र मोदींना गुजरातचे मुख्यमंत्री बनवण्यातही महत्त्वाची भूमिका बजावली आहे आणि लालकृष्ण आडवाणींनी जो सांस्कृतिक आणि हिंदुत्वाच्या राष्ट्रवादाचा अजेंडा राबवायला सुरूवात केली होती, तोच पुढे नेण्याचं काम पंतप्रधान मोदी करत आहेत.
 
ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता यांनीही असंच मत मांडलं. प्रमोद महाजन, सुषमा स्वराज, अरुण जेटली आणि नरेंद्र मोदी हे सर्वजण अडवाणींच्या मुशीत तयार झालेले आहेत, असं ते म्हणतात.
 
गुप्ता म्हणतात, "पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना भारतरत्न देऊन कृतज्ञता व्यक्त केली आहे."
 
नुकसान भरपाई तर नाही ना?
22 जानेवारी रोजी अयोध्येतील श्री रामजन्मभूमीवर बांधण्यात येत असलेल्या श्री राम मंदिरात रामललाच्या प्राण प्रतिष्ठेचा कार्यक्रम होता.
 
या कार्यक्रमात देश-विदेशातील हजारो लोकं सहभागी झालेले, परंतु श्री राम मंदिर आंदोलनाचे नेतृत्व करणारे लालकृष्ण आडवाणी आणि मुरली मनोहर जोशी हे दोन प्रमुख चेहरे गायब होते.
 
मंदिर ट्रस्टने त्यांना निमंत्रण पाठवलं नाही, असं नाही. खरंतर, राम मंदिर ट्रस्टचे सरचिटणीस चंपत राय म्हणाले, “आडवाणीजींची उपस्थिती अनिवार्य आहे पण आम्ही त्यांना न येण्याची विनंती करू… मला वारंवार सांगावं लागतंय की ते वयोवृद्ध आहेत, थंडी आहे आणि त्यांच्या गुडघ्यांवरदेखील शस्त्रक्रिया झालेली आहे.”
 
ट्रस्टतर्फे वारंवार सांगण्यात आलं की त्यांची तब्येत ठीक नाही, मात्र हे जाणूनबुजून करण्यात आल्याचं मत ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री यांनी व्यक्त केलं.
 
ते म्हणतात की, “लोकांना आमंत्रित केलं जातं, परंतु आडवाणींनी येऊ नये असं सांगण्यात आलं आणि हे संपूर्ण देशाने पाहिलं. चंपत राय म्हणाले, तुम्ही येऊ नका. जेव्हा तुम्ही त्यांच्याच वयाच्या दलाई लामांना बोलवू शकता, मग अडवाणींना का नाही? भाजपला याची लाज वाटली आहे, कुठेतरी नुकसान भरपाई करण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
 
अत्री म्हणतात, "भाजप दहा वर्षे सत्तेत आहे, ठरवलं असतं तर हा सन्मान आधीही देता आला असता, परंतु कदाचित राम मंदिर कार्यक्रमामुळे ‘भारतरत्न’ सन्मानासाठीचा मार्ग खुला झालाय.”
 
भाजपला काय संदेश द्यायचा आहे?
 
बिहारचे माजी मुख्यमंत्री कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्याची घोषणा झाली तेव्हा राजकीय विश्लेषकांनी याला निवडणूक स्टंट म्हटलं होतं.
 
बिहारमधील अत्यंत मागास वर्गाला आपल्या बाजूने वळवण्यासाठी आणि बिहारमध्ये केलेल्या जात सर्वेक्षणावर कुरघोडी करण्यासाठी हा निर्णय घेण्यात आल्याचं विश्लेषकांचं म्हणणं आहे.
 
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात, “काही दिवसांपूर्वी कर्पूरी ठाकूर यांना भारतरत्न देण्यात आला होता. राजकीय भाषेत सांगायचं झालं तर, मंडल आणि कमंडल अशा दोन्हींची सांगड घालण्याचा प्रयत्न केला गेलाय.
 
परंतु आडवाणींना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचा निवडणुकीशी काडीमात्र संबंध नाही, असं ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता यांना वाटतं.
 
ज्येष्ठ पत्रकार हेमंत अत्री म्हणतात, “भाजपमधील एका मोठ्या वर्गाने आयुष्यभर जनसंघ आणि आरएसएसची सेवा केली. अडवाणींना योग्य तो सन्मान दिला गेला नाही याचा त्यांना राग होता.
 
अत्री सांगतात, "भारतरत्नच्या माध्यमातून या वृद्ध मंडळींना खूश करण्याचा प्रयत्न करण्यात आलाय आणि हा संदेश दिला गेलाय की, नव्या लोकांसोबतच आम्ही जुन्या लोकांनाही विसरत नाही.”
 
भारतरत्न दिल्याबद्दल प्रश्नचिन्ह?
गृहमंत्रालयानुसार भारतरत्न कोणाला मिळणार? याची शिफारस खुद्द पंतप्रधान राष्ट्रपतींकडे करतात.
 
याशिवाय, इतर कोणत्याही औपचारिकतेची गरज भासत नाही. एका वर्षात जास्तीत जास्त तीन भारतरत्न दिले जाऊ शकतात.
 
भारतरत्न पुरस्कार हा राजकीयदृष्ट्या प्रेरित सन्मान आहे, असं राजकीय विश्लेषकांना वाटतं.
 
ज्येष्ठ पत्रकार शरद गुप्ता म्हणतात, “भारतरत्न कोणाला दिला गेला पाहिजे याचे कोणतेही निकष नाहीत किंवा योग्यतेची कोणतीही विशिष्ट व्याख्या नाही. लोकसभेच्या निवडणुकीत हरले तर त्यांना राज्यसभेवर पाठवले जाते. काही लोकांना खूश करण्यासाठी राज्यपालपदी नेमणूक केली जाते, तर विशिष्ट वर्गाला संतुष्ट करण्यासाठी राष्ट्रपती बनवलं जातं. हीच गोष्ट भारतरत्नला देखील लागू होते.”
 
ते म्हणतात, “आडवाणी यांनी सोमनाथ ते अयोध्या यात्रा केली, तेव्हा अनेक ठिकाणी दंगली उसळल्या. त्यांना कार्यकर्त्यांपर्यंत आपला राजकीय संदेश पोहोचवायचा होता, तो देशासाठी राजकीय संदेश नव्हता. अडवाणींनी मांडलेल्या विचारसरणीचा देशाला काय फायदा झाला, हा वादाचा मुद्दा आहे.”
 
ज्येष्ठ पत्रकार विजय त्रिवेदी म्हणतात की, लालकृष्ण आडवाणी यांना भारतीय जनता पक्ष किंवा जनसंघाचे नेते म्हणून पाहणे त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर अन्याय केल्यासारखं होईल.
 
ते म्हणतात, “मला वाटतं आजघडीला भारतीय राजकारणात जेव्हा नेत्यांवर भ्रष्टाचार, ईडी आणि तुरुंगात जाण्याची चर्चा होतेय, त्या पार्श्वभूमीवर आडवाणींच्या कुशाग्र राजकीय बुद्धिमत्तेशी बरोबरी साधणारे फार कमी नेते दिसतात.”
 
“जेव्हा लालकृष्ण आडवाणी यांचं नाव हवाला घोटाळ्यात समोर आलं तेव्हा त्यांनी ताबडतोब लोकसभेच्या खासदारकीचा राजीनामा दिला आणि जोपर्यंत त्यांच्यावरील सर्व आरोप पुसले जात नाहीत तोपर्यंत संसदीय राजकारण करणार नसल्याचंही त्यांनी जाहीर केलं. आजघडीला भ्रष्टाचारात अडकलेले राजकारणी तुरुंगातून सरकार चालवण्याची भाषा करत आहेत.
 
त्यासोबतच लालकृष्ण आडवाणी यांची युतीच्या राजकारणातील भूमिका लक्षात घ्यायला हवी, कारण आजघडीला राजकारणाची वाटचाल पुन्हा त्याच दिशेने सुरू आहे, असंही ते म्हणतात.
 
ते म्हणाले, “1996 मध्ये पाठिंब्याअभावी वाजपेयीजींचे सरकार 13 दिवसांत कोसळलं. तेव्हा आडवाणी म्हणाले होते की आपण सामाजिक अस्पृश्यता संपवण्याविषयी बोलतो, पण आपण राजकीय अस्पृश्यता पाळत आहोत. ही राजकीय अस्पृश्यता संपुष्टात आली पाहिजे.”
 
युतीच्या राजकारणात ‘राजकीय अस्पृश्यता’ हा परवलीचा शब्द आहे. कोणत्याही राजकीय पक्षाला शत्रू किंवा अस्पृश्य मानणे योग्य नाही आणि हेच कारण आहे की त्यांनी ‘एनडीए’ आघाडीला चांगल्या प्रकारे चालवलं.”
 
आडवाणींच्या मुलीला काय वाटतं?
लालकृष्ण अडवाणी यांना हा सन्मान जाहीर झाल्याच्या घोषणेनंतर त्यांची कन्या प्रतिभा आडवाणी यांनी आनंद व्यक्त केलाय.
 
प्रतिभा आडवाणी पत्रकारांना म्हणाल्या, "'दादां’ना देशाचा सर्वोच्च सन्मान मिळाल्याचा मला आणि संपूर्ण कुटुंबाला आनंद आहे. आज मला माझ्या आईची सर्वात जास्त आठवण येतेय. आईचं दादांच्या आयुष्यात खूप मोठं योगदान आहे. तिने दादांच्या वैयक्तिक आणि राजकीय आयुष्यात खूप मोलाची भूमिका बजावली आहे."
 
त्यांनी सांगितलं की, "दादा खूप खूष आहेत. जेव्हा मी दादांना ही बातमी सांगितली तेव्हा त्यांना खूप आनंद झाला. ते म्हणाले, त्यांनी आयुष्यभर देशसेवा केली, याचा त्यांना खूप आनंद आहे आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि देशाची जनता, ज्यांच्यावर ते अपार प्रेम करतात त्यांचे ते खूप आभारी आहेत."
 
"आयुष्यभर ते मोजकंच बोलले पण साहजिकच त्यांच्या डोळ्यात आनंदाश्रू होते. त्यांनी आयुष्यभर देशसेवा केली याचं समाधान आणि आनंद दोन्ही आहे. आयुष्याच्या या वळणावर देशाचा सर्वोच्च सन्मान मिळणं ही अतिशय मोठी गोष्ट आहे."
 
भाजप नेत्यांनी केला अभिनंदनाचा वर्षाव
संरक्षण मंत्री राजनाथ सिंह म्हणाले, "आमच्या सर्वांचे प्रेरणास्थान आणि देशाचे ज्येष्ठ नेते आदरणीय लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न देण्याच्या निर्णयाचा मला खूप आनंद झाला आहे. राजकारणातील पावित्र्य, समर्पण आणि दृढनिश्चय याचं ते प्रतीक आहेत. अडवाणींनी त्यांच्या प्रदीर्घ सार्वजनिक आयुष्यात, विविध भूमिकांमध्ये देशाच्या विकासात आणि राष्ट्र उभारणीत दिलेलं महत्त्वपूर्ण योगदान अविस्मरणीय आणि प्रेरणादायी आहे."
 
"भारताची एकता आणि अखंडता अबाधित ठेवण्यातही त्यांनी महत्त्वाची भूमिका बजावली आहे. एक राष्ट्रीय नेता म्हणून त्यांनी आपली विद्वत्ता, संसदीय आणि प्रशासकीय क्षमतेचा वापर करून देश आणि लोकशाही बळकट केली. त्यांना भारतरत्न सन्मान प्राप्त होणं ही प्रत्येक भारतीयासाठी आनंदाची बाब आहे. या निर्णयाबद्दल मी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि आडवाणी जींचे अभिनंदन करतो."
 
उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ म्हणाले, “भारतीय जनता पक्षाचे संस्थापक सदस्य, असंख्य कार्यकर्त्यांचे प्रेरणास्थान आणि माजी उपपंतप्रधान, आदरणीय लालकृष्ण आडवाणी यांना भारतरत्न पुरस्काराने सन्मानित करण्याचा निर्णय हा त्यांनी अनेक दशकं केलेली समाजाची सेवा, वचनबद्धता आणि अखंड राष्ट्राबद्दलची त्यांची अतूट बांधिलकी तसेच राजकीय जीवनातील पावित्र्य आणि नैतिकतेचा उच्च मापदंड प्रस्थापित करण्याच्या त्यांच्या अनोख्या प्रयत्नांचा गौरव करणारा क्षण आहे."
 
"राष्ट्रीय एकात्मता आणि सांस्कृतिक पुनरूज्जीवनासाठी त्यांनी केलेले अथक प्रयत्न आपल्या सर्वांसाठी प्रेरणादायक आहेत. आदरणीय आडवाणीजींचे हार्दिक अभिनंदन!"
 
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी म्हणाले, "देशाचे ज्येष्ठ नेते आणि आमचे मार्गदर्शक आदरणीय लालकृष्ण आडवाणींना भारतरत्न देण्याची घोषणा अत्यंत सुखद आणि आनंददायी आहे."
 
"आडवाणीजींनी स्वातंत्र्यानंतर देशाच्या पुनर्रबांधणीत मोलाची भूमिका बजावली आहे आडवाणी हे राजकारणातील पावित्र्याचं जिवंत उदाहरण आहेत."
 
"आडवाणीजींना 'भारतरत्न' घोषित केल्याबद्दल मी पंतप्रधान श्री नरेंद्र मोदी यांचे आभार मानतो आणि आडवाणींजींना चांगलं आरोग्य आणि दीर्घायुष्य लाभो अशी प्रार्थना करतो."
 
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

राम सीतेची बदनामी झाल्याचा आरोप करत पुण्यात 'ते' नाटक पाडले बंद, कलाकारांना अटक