नाशिकसह परिसरात काल रात्रभरापासून तुफान पाऊस सुरू असून गोदावरी नदीने रौद्ररूप धारण केले आहे. शुक्रवारी दिवसभरात परिसरात सुमारे 150 मि.मी. इतका पाऊस झाला असून त्यामुळे 120 गावांमध्ये पाणी शिरले आहे. 1969 नंतर पहिल्यांच गाडगे महाराज पूल पाण्याखाली गेला आहे.
येथील प्रसिध्द पंचवटीतील रामघाट परिसर पाण्याखाली गेला आहे. या परिसरातील मारूती पूर्णतः बुडाला आहे. इतकेच नव्हे तर याच घाटावर असलेली प्रसिद्ध नारोशंकराची घंटाही जवळपास बुडाली आहे. प्रसिद्ध सरकारवाड्यापर्यंत पुराचे पाणी पोचले असून त्याच्या 5-6 पाय-या पाण्याखाली गेल्या आहेत.
शहरातील गाडगे महाराज पूल, उंटवाडी पूलासह दसक गावापर्यंतचे जवळपास सर्व पूल पाण्याखाली गेले आहेत. पंचवटीला जोडणारा मुख्य होळकर पुलालाही पाणी लागण्याच्या बेतात आहे. हे सर्व मार्ग वाहतुकीसाठी बंद करण्यात आले आहेत. या पुराने आतापर्यंतचे सगळे विक्रम मोडीत काढले आहेत. १९६९ साली आलेल्या पुराशी याची तुलना होत आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही तुफान पाऊस होत असल्याने गंगापूर धरणातून ७५ हजार क्युसेक पाणी सोडण्यात आले आहे. त्यामुळे मराठवाड्यातील जायकवाडी धरणाचेही दरवाजे उघडण्यात आले आहेत. शहरात आता पाऊस थांबला असला तरीही नाशिक परिसरात पाऊस सुरूच असल्याने द्राक्षबागांचेही मोठे नुकसान झाले आहे.
गोदावरीच्या दोन्ही काठांना पुराचा फटका बसला आहे. शहरातील भांडीबाजार, सराफ बाजारातही पुराचे पाणी घुसले आहे. धोका टाळण्यासाठी या भागातील वीज पुरवठा बंद करण्यात आला आहे. पूरग्रस्तांना हलविण्यासाठी महापालिकेतर्फे बोटींचा वापर केला जात आहे. नाशिकमध्ये आलेल्या पुराच्या पाण्याने नेहमीप्रमाणे सायखेडा, चांदोरी या गावांनाही पुराचा वेढा पडला आहे. या गावांचा नाशिकशी संपर्क तुटला आहे. त्र्यंबकेश्वरमध्येही तुफान पाऊस सुरू आहे. इगतपुरीतही तीच परिस्थिती असल्याने अनेक गावांचा संपर्क तुटला आहे.
सायंकाळी पावसाने उघडीप दिली असली तरीही रात्री पुन्हा पावसाची शक्यता वर्तविण्यात आली आहे. दरम्यान, पावसामुळे रेल्वे वाहतुकीवर काहीही परिणाम झालेला नाही.
भंडारद-यात 5 जण अडकलेः भंडारदरा धरणातून पाणी सोडल्यानं धबधबा पाहण्यासाठी गेलेले पाच जण पाण्याची पातळी अचानक वाढल्याने एका बेटावर अडकले आहेत. अडकलेले पाचही जण घाटगर प्रकल्पाचे कर्मचारी असून त्यांना सोडविण्यासाठी प्रयत्न सुरू होते. सुरुवातीला या बेटावर जाण्यासाठी रस्ता असताना अचानक धरणातून पाणी सोडल्यानं पाण्याची पातळी वाढल्याने पाचही जण अडकले आहेत. भंडारद-यातून सध्या 30 ते 35 हजार क्यु. पाणी सोडले आहे.