Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

स्वप्नील कुसाळे फायनलमध्ये, कोल्हापूरच्या नेमबाजाला पॅरिस ऑलिंपिकमध्ये पदकाची संधी

Kolhapur's Swapnil Kusale
, बुधवार, 31 जुलै 2024 (15:48 IST)
भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेनं पॅरिस ऑलिंपिकच्या फायनलमध्ये प्रवेश केला आहे.स्वप्नील मुळचा कोल्हापूरच्या राधानगरीचा आहे. नाशिकच्या क्रीडा प्रबोधिनीतून त्यानं नेमबाजीचे प्राथमिक धडे गिरवले होते. नेमबाज विश्वजीत शिंदे आणि दीपाली देशपांडे यांंचं मार्गदर्शन त्याला लाभलं आहे.

पुण्यात बालेवाडी इथे तो सराव करतो. 2022 साली एशियन गेम्समध्ये त्यानं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं.
त्याशिवाय भारताच्या राजेश्वरी कुमारी आणि श्रेयसी सिंग ट्रॅप नेमबाजीच्या दुसऱ्या पात्रता सामन्यात खेळत आहेत.
 
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू आणि लक्ष्य सेननं राऊंड ऑफ 16 मध्ये प्रवेश केला आहे. लक्ष्य सेननं ऑल इंग्लंड चॅम्पियन जोनाथन ख्रिस्टीवर मात केली.
 
त्याशिवाय बॅडमिंटनमध्ये एच एस प्रणोय तर तिरंदाजीत दीपिका कुमारी आणि बॉक्सिंगमध्ये लवलिना बोर्गोहाईंसारखे दिग्गज खेळताना दिसतील.
ऑलिंपिकमध्ये यंदा 32 क्रीडाप्रकारांत 329 सुवर्णपदकांसाठी हजारो अ‍ॅथलीट्स शर्यतीत आहेत. भारतानं या क्रीडा स्पर्धेसाठी 110 जणांचं पथक पाठवलं असून 16 क्रीडाप्रकारांत भारतीय खेळाडू सहभागी होत आहेत.
मनू भाकर, सरबजोतचं ऐतिहासिक पदक (30 जुलै)
भारताच्या मनू भाकरनं एकाच ऑलिंपिकमध्ये दोन पदकं जिंकण्याची कमाल केली .
 
मनूनं सरबजोत सिंगच्या साथीनं 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात मिश्र सांघिक नेमबाजीत कांस्य पदक मिळवलं. याआधी महिलांच्या वैयक्तिक 10 मीटर एयर पिस्टल स्पर्धेतही मनूनं कांस्यपदक जिंकलं होतं.
 
मनू आणि सरबजोतनं काल झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांसह तिसरं स्थान मिळवलं होतं. आज त्यांनी कांस्य पदकाच्या लढतीत दक्षिण कोरियावर 16-10 अशी मात केली. मिश्र नेमबाजीत भारताचं हे पहिलं ऑलिंपिक पदक आहे.अवघ्या 22 वर्षांच्या वयात मनूनं हे ऐतिहासिक यश मिळवलं आहे.
 
2021 साली बीबीसीच्या इंडियन स्पोर्ट्सवूमन ऑफ द ईयर सोहळ्यात मनू भाकरला सर्वोत्तम उदयोन्मुख खेळाडू म्हणून गौरवण्यात आलं होतं.
मनूला कांस्य पदकासाठीच्या फायनलमध्ये साथ देणारा सरबजोत सिंगही अवघ्या 22 वर्षांचा आहे.
सरबजोतनं याआधी 2022 मध्ये हांगझूमधल्या आशियाई क्रीडा स्पर्धेतही 10 मीटर एयर पिस्टल प्रकारात सांघिक आणि मिश्र सांघिक प्रकारांत सुवर्णपदकं मिळवली होती.
तर 2023 साली भोपाळ आणि बाकूमध्ये झालेल्या वर्ल्डकप स्पर्धांमध्येही त्यानं सुवर्णपदकांची कमाई केली.
सरबजोतनं 2019 साली ज्युनियर वर्ल्ड कपमध्येही पदकांची कमाई केली होती.
 
सरबजोत हरियाणाच्या अंबालामधला असून अभिषेक राणा यांच्या हाताखाली तो नेमबाजीचा सराव करतो. त्याचे वडील जतिंदर सिंग शेतकरी असून आई हरदीप कौर गृहिणी आहेत.
 
दरम्यान, भारताच्या हॉकी टीमनं साखळी सामन्यात आयर्लंडवर 2-0 अशी मात केली.
 
बॅडमिंटन पुरुष दुहेरीत चिराग शेट्टी आणि सात्विकसाईराज रांकिरेड्डी या जोडीनं उपांत्यपूर्व फेरी गाठली आहे.
 
तिरंदाजीत भजन कौरनं उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश केला आहे पण अंकिता भाकतचं आव्हान मात्र संपुष्टात आलं.
 
पुरुषांच्या ट्रॅप नेमबाजीच्या पात्रता फेरीत पृथ्वीराज तोंडाईमानला 21 व्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर महिलांच्या ट्रॅप नेमबाजीत श्रेयसी सिंग आणि राजेश्वरी खेळत आहेत. तर हॉकीमध्ये भारताची आयर्लंडसोबत लढत सुरू आहे.
 
रोईंगमध्ये भारताच्या बलराज पनवरनं उपांत्यपूर्व फेरीत त्याच्या गटात पाचवं स्थान मिळवल्यानं त्याच्या पदच्या आशा संपुष्टात आल्या.
 
अर्जुन बबुताचं पदक थोडक्यात हुकलं (29 जुलै)
नेमबाजीच्या 10 मीटर एयर रायफल प्रकारात अर्जुन बबुतानं शर्थ केली, पण त्याला चौथ्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
अर्जुन एकेकाळी दुसऱ्या स्थानावर होता. मात्र दुसऱ्या एलिमिनेशन राऊंडमध्ये एका शॉटवर त्यानं 9.9 गुणच मिळवले. मग तिसऱ्या स्थानासाठीच्या एलिमिनेशन राऊंडमध्ये अर्जुननं 9.5 गुणच मिळवले. त्याचा प्रतिस्पर्धी मिरान मारिसिचनं मात्र 10.7 गुणांसह तिसरं स्थान निश्चित केलं.
 
त्यामुळे पदकाच्या अगदी जवळ पोहोचूनही अर्जुनला रिकाम्या हाती माघारी फिरावं लागलं.
महिलांच्या 10 मीटर एयर रायफल फायनलमध्ये भारताच्या रमिता जिंदालला सातव्या स्थानावर समाधान मानावं लागलं.
 
तर भारताच्या पुरुष तिरंदाजी संघाचं आव्हान उपांत्यपूर्व फेरीत संपुष्टात आलं. तुर्कीनं भारताला 6-2 असं हरवलं.
 
हॉकीमध्ये भारत आणि अर्जेंटिनामधला सामना 1-1 असा बरोबरीत सुटला.
 
मनू भाकरनं उघडलं पदकांचं खातं (28 जुलै)
22 वर्षीय मनूनं 10 मीटर एयर पिस्टल नेमबाजीत कांस्य पदक पटकावून पॅरिस ऑलिंपिकमध्ये भारताचं पदकांचं खातं उघडलं.
 
मनू ऑलिंपिकमध्ये पदक मिळवणारी पहिली भारतीय महिला नेमबाज ठरली आहे. तिनं कमावलेल्या या कांस्य पदकामुळे भारताची ऑलिंपिक नेमबाजीत पदकांची 12 वर्षांची प्रतीक्षा संपुष्टात आली
टोकियो ऑलिंपिकमध्ये मनू भाकरच्या पदरी निराशा पडली होती. ते अपयश मागे सारत तिनं पॅरिसमध्ये कांस्य पदकाची कमाई केली.
 
तिनं फायनलमध्ये 221.7 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
 
तसा 28 जुलैचा दिवस भारतीय नेमबाजांसाठी आशादायक ठरला. कारण 10 मीटर एयर रायफल नेमबाजीत रमिता जिंदाल आणि अर्जुन बबुटा यांनी फायनल गाठली.
 
महिलांच्या 10 मीटर एयर रायफल महिलांच्या गटात भारताच्या रमिता जिंदालनं 631.5 गुणांसह पाचवं स्थान मिळवलं फायनल गाठली. नेमबाजीच्या या प्रकारात भारताच्या इलानेविल वेलारिवानला मात्र दहाव्या स्थानावर समाधान मानावं लागलं. तर अर्जुन बबुटानं 630.1 गुणांसह सातवं स्थान गाठलं आणि फायनलमधला प्रवेश निश्चित केला. या गटात संदीप सिंगनं बारावं स्थान गाठलं.
तिरंदाजीच्या उपांत्यपूर्व फेरीत मात्र भारताच्या महिला टीमचा पराभव झाला. नेदरलँड्सनं भारतावर 6-0 अशी मात केली. टेनिसमध्ये सुमित नागल तर टेबल टेनिसमध्ये अचंता शरथ कमल आणि हरमीत देसाई यांचं आव्हान संपुष्टात आलं.
 
बॅडमिंटनमध्ये पीव्ही सिंधू, बॉक्सिंगमध्ये निखत झरीन तर टेबल टेनिसमध्ये श्रीजा अकुला आणि मनिका बत्रा यांनी आगेकूच केली आहे. तर रोईंगमध्ये बलराज पनवर उपांत्यपूर्व फेरीसाठी पात्र ठरला.
 
मनू भाकरनं गाठली फायनल (27 जुलै)
22 वर्षीय मनूनं 27 जुलैला झालेल्या पात्रता फेरीत 580 गुणांची कमाई करत तिसरं स्थान मिळवलं.
 
मनूनं पात्रता फेरीच्या पहिल्या दोन सीरीजमध्ये प्रत्येकी 97 गुणांची कमाई केली. तिसऱ्या सीरीजमध्ये 98 गुण मिळवत मनूनं तिसरं स्थान गाठलं. पाचव्या सीरीजमध्ये तिनं एका खराब शॉटवर फक्त 8 गुण मिळवले, पण तेवढा एक शॉट वगळता मनूनं उत्तम कामगिरी करत फायनलमध्ये आपलं स्थान निश्चित केलं.
 
भारताची आणखी एक पिस्टल नेमबाज ऱ्हिदम सांगवान पात्रता फेरीत पंधरावी आली. तिनं 573 गुणांची कमाई केली.
 
शानदार उद्घाटन सोहळा
तब्बल 100 वर्षांनी पॅरिसमध्ये पुन्हा एकदा ऑलिंपिकचं आयोजन केलं जातंय. तसंच तिसऱ्यांदा पॅरिसनं ऑलिंपिकचं आयोजन केलं आहे.
 
ऑलिंपिकची सुरुवात जरी ग्रीसमध्ये झाली असली, तरी आधुनिक ऑलिंपिक पॅरिसमध्येच आकाराला आलं. साहजिकच या पॅरिसचं ऑलिंपिकशी खास नातं आहे. उदघाटन सोहळ्यातही त्याची झलक पाहायला मिळाली.
2024 चा उद्घाटन सोहळा न भूतो न भविष्यती असाच होता. या स्पर्धेत सहभागी झालेल्या 205 देशांच्या संघांची परेड यावेळी स्टेडियममध्ये नाही, तर सीन नदीत बोटींवरून निघाली. परेडच्या पूर्ण मार्गावर ठीकठीकाणी कलाविष्कार पाहायला मिळाले.
कार्यक्रमाच्या अखेरीस टॉर्च रिलेमध्ये फ्रान्सचा सुपरस्टार फुटबॉलर झिनेदिन झिदान सहभागी झाला. तर टेनिसस्टार राफेल नदाल, सेरेना विल्यम्स, अमेली मोरेस्मो तसंच अ‍ॅथलीट कार्ल लुईस आणि जिम्नॅस्ट नादिया कोमानेची यांच्यासह फ्रान्सचे अनेक दिग्गज खेळाडू रिलेच्या अखेरच्या टप्प्यात सहभागी झाले होते.
 
एका महिला आणि पुरुष अ‍ॅथलीटनं एकत्रितपणे ऑलिंपिक ज्योत प्रज्वलित केली आणि विविधतेत एकता आणि समानतेचा संदेश दिला. यंदा पहिल्यांदाच ऑलिंपिकमध्ये पुरुष आणि महिला खेळाडूंचं प्रमाण 50-50% एवढं समान आहे.
लेडी गागा आणि सेलिन डियॉन सारख्या दिग्गज कलाकारांच्या सादरीकरणानं उद्घाटन सोहळ्यात रंगत आणली.
लेडी गागानं सुरुवातीला गाणं सादर केलं तर सेलिन डियॉननं आयफेल टॉवरच्या अर्ध्यावरील टेरेसावरून गात कार्यक्रमाची सांगता केली. दोन वर्षांपूर्वी एका दुर्धर आजारामुळे गाण्याचे कार्यक्रम सेलिन डियॉननं बंद केले होते. एक प्रकारे तिचं हे कमबॅक ठरलं.
 
फ्रान्समधल्या कला, संगीत, इतिहास आणि ऑलिंपिक चळवळीची वाटचाल अशा गोष्टींचं प्रतीक त्यात पाहायला मिळालं.
Published By- Priya Dixit 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

UPSC च्या नवीन अध्यक्षापदी प्रीती सुदान यांची निवड