Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Pune Weekend Lockdown : पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा

Pune Weekend Lockdown : पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा
पुणे , शनिवार, 19 जून 2021 (15:42 IST)
पुण्यात विकेंड लॉकडाऊन लावण्याची घोषणा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवारांनी आज केली. पुण्यात शनिवार-रविवारी अत्यावश्यक सेवा वगळता सर्व व्यवहार बंद राहणार असल्याचंही अजित पवार यांनी स्पष्ट केलं. तसेच पुण्यातून बाहेर फिरायला जाणाऱ्यांना पुन्हा पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन करण्यात येईल, असा इशाराही त्यांनी दिला आहे.
 
अजित पवार यांनी आज पुण्यातील अधिकारी आणि लोकप्रतिनिधींशी चर्चा करून कोरोना परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पुण्यात विकेंड लॉकडाऊन लागू करण्यात येणार असल्याचं जाहीर केलं. जिल्ह्यात शनिवार आणि रविवारी सर्व बंद राहणार आहे. फक्त अत्यावश्यक सेवांना मुभा देण्यात येईल. ग्रामीण भागातही हे नियम लागू राहणार आहे, असं पवार यांनी सांगितलं. परिस्थिती नियंत्रणात आली तर नियमात बदल केला जाईल, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पर्यटन स्थळी येऊ नका
पावसाळा सुरू झाल्यापासून अनेक लोकांनी महाबळेश्वर, खोपोली, लोणावळा आणि खंडाळ्यात गर्दी करायला सुरुवात केली आहे. नागरिकांनी पर्यटन स्थळी येऊन गर्दी करू नये. पावसात भिजू नये. कोरोना अजूनही संपलेला नाही. त्यामुळे सर्व काही बंद असताना तुम्ही घराबाहेर पडण्याचं कारणच नाही, असं त्यांनी सांगितलं. तरुण पिढी नाराज होण्याची शक्यता आहे. पण अमेरिकेत शंभर टक्के लसीकरण झालेलं असतानाही तिथे तिसरी लाट आली. आपल्याकडे अजूनही लसीकरण पूर्ण झालेलं नाही. त्यामुळे जनतेच्या जिवीताची खबरदारी घेणं हे आमचं कामच आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलं.
 
पुण्याबाहेर जाऊ नका
अनेक लोक अजूनही गांभीर्याने घेत नाही. कारण नसताना घराबाहेर पडत आहेत. अत्यंत महत्त्वाची कामं असतील तरच बाहेर जा. काही लोकं तर पुण्याच्या बाहेर जात आहेत. पुण्याच्या बाहेर जाणाऱ्यांना पुण्यात आल्यावर 15 दिवसांसाठी क्वॉरंटाईन केलं जाईल, असा इशाराही त्यांनी दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Father's Day फादर्स डे इतिहास, महत्त्व