मनसेचे पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी आज राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यांनी राज ठाकरे यांच्या मशिदीवरील भोंग्याच्या विषयावर नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर झालेल्या या भेटीने तुर्त मनसे सोडण्याचा चर्चेला पुर्णविराम मिळाला.
मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंग्याबाबत गुढीपाडव्याला झालेल्या सभेत वक्तव्य केले होते. त्यानंतर मनसेत अनेक राजकीय घडामोडी घडल्या आहेत. पुणे शहर अध्यक्ष वसंत मोरे यांनी राज ठाकरे यांच्या भूमिकेवर उघड उघड नाराजी व्यक्त केली होती. त्यामुळे त्यांना शहराध्यक्षपदावरून बाजूला करण्यात आलं.
यादरम्यान, वसंत मोरेंना शिवसेनेसह अनेक मोठ्या पक्षांकडून ऑफर येण्यास सुरुवात झाली. मात्र वसंत मोरे यांनी राज ठाकरेंना भेटल्याशिवाय कोणताही निर्णय घेणार नसल्याचे स्पष्ट केलं. आज त्यांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. त्यानंतर माध्यमांशी बोलतांना ते म्हणाले की, तुम्हाला ठाण्यातील उद्या होणाऱ्या सभेत सगळ्या प्रश्नांची उत्तर मिळणार आहेत. साहेबांच्या भेटीवर मी १०० टक्के समाधानी आहे. मी पहिल्यापासून सांगत होतो की मी मनसेत राहणार आहे.