राज्य सरकारच्या पुढाकाराने 1 जुलैला होत असलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सरकारी कर्मचार्यांनी प्रत्यक्ष सहभाग घेणे आवश्यक आहे. त्यासाठी या वृक्षारोपणासोबत एक सेल्फी काढून तो कार्यालयात सादर करावा, असा आदेश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला.
राज्याच्या विविध भागांत 1 जुलै रोजी होणार्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमात सरकारी, निमसरकारी अधिकारी कर्मचारी, शाळा-कॉलेजचे शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी, अधिकारी सहभागी होणार असल्याने त्यांचा या दिवशी दुपारी 1 वाजेपर्यंतचा वेळ हा शासकीय कामकाजाचा भाग म्हणून गृहीत धरण्यात येणार आहे. या कालावधीत अधिकारी व कर्मचार्यांनी प्रत्यक्ष वृक्षारोपणात भाग घेणे, स्वयंसेवक म्हणून काम करणे, नागरिकांना वृक्षारोपणासाठी प्रोत्साहित करणे, यासाठी आवश्यक ते साहाय्य करणे या बाबी अपेक्षित आहेत. तसेच, अधिकारी कर्मचार्यांनी या कामाचा सेल्फी सादर करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
वन विभागाचे सचिव विकास खारगे यांनी मुख्यमंत्री, सर्व पालकमंत्री आणि सर्व सचिवांसमोर या वृक्षारोपण कार्यक्रमाचे सादरीकरण केले. जी व्यक्ती झाड लावून या आठवणींचे जतन करू इच्छिते, मात्र त्याच्याकडे झाड लावण्यासाठी वेळ नाही, अशांसाठी मोबाइल अँपद्वारे पैसे भरून झाड लावण्याची व्यवस्था वन विभागाने विकसित करावी. त्या बदल्यात त्या व्यक्तीस ग्रीन सर्टिफिकेट द्यावे असे सांगून मुख्यमंर्त्यांनी वन विभागाने हाती घेतलेल्या वृक्षारोपणाच्या कार्यक्रमाचे कौतुक केले. या कार्यक्रमासाठी सर्व पालकमंत्री आणि पालक सचिवांनी आपापल्या जिल्ह्यात उपस्थित राहून सहभागी व्हावे व आपलाही ‘सेल्फी विथ ट्री’ फोटो वन विभागाकडे पाठवावा, असे आवाहनही मुख्यमंर्त्यांनी केले.