सिंधू विहार येथे ड्रेनेजलाइन कामासाठी खोदण्यात आलेल्या खड्डय़ातील पाण्यात बुडून पीयूष वळसंगकर या 13 वर्षाच्या बालकाच्या मृत्यूला मक्तेदार कंपनी जबाबदार असून या कंपनीविरुध्द कडक कारवाई करण्यासाठी सर्वपक्षीय नगरसेवकांनी स्थायी समितीची बैठक डोक्यावर घेतली.
सभापती रिाज हुंडेकरी यांच्या अध्क्षतेखाली झालेल्या या बैठकीत बसपाचे नगरसेवक आनंद चंदनशिवे यांनी तातडीचा प्रस्ताव मांडून या विषयाला तोंड फोडले. सिंधू विहार येथे ड्रेनेजलाइन टाकण्याचे काम सुरू आहे. या कामासाठी 15 फूट खोल खड्डा खणला असून तो पावसाच्या पाण्याने भरला आहे. या खड्डय़ातील पाण्यात पडल्याने पीयूष प्रसाद वळसंगकर या 13 वर्षाच्या बालकाचा मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेला ड्रेनेजचे काम करणारी मक्तेदार कंपनीच जबाबदार आहे. कारण अशी दुर्दैवी घटना घडू नये याची खबरदारी या कंपनीने घेतलेली नव्हती.