मेक इन इंडिया सप्ताहाच्या पाचव्या दिवशी मेक इन इंडिया सेंटरमध्ये मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत स्मार्ट सिटी, हवाई वाहतूक, किरकोळ उद्योग, लघु व मध्यम उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रातील 18 सामंजस्य करार करण्यात आले. काल झालेले 18 व यापूर्वी केलेल्या सामंजस्य करारामुळे राज्यात 8 लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाल्याची माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी यावेळी दिली.
आधुनिक स्मार्ट शहर संकल्पनेच्या निर्मितीसाठी 11 गावांचे एकत्रित प्रतिनिधित्व करणार्या खालापूर नगरपंचायत, कलोटे मोकाशी ग्रामपंचायत, नादोडे ग्रामपंचायत यांनी एकूण 3550 हेक्टर जमिनीच्या लॅण्ड पुलिंगसाठी स्वेच्छेने पुढाकार घेतला आहे. या स्मार्ट शहराचा विकास नैना योजनेच्या धर्तीवर करण्यात येणार आहे. यासंबंधीचा करार आज मुख्यमंत्री ङ्खडणवीस, उद्योगमंत्री सुभाष देसाई, सिडकोचे व्यवस्थापकीय संचालक संजय भाटिया, उद्योग विभागाचे प्रधान सचिव अपूर्व चंद्रा यांच्या उपस्थितीत करण्यात आला.
या कराराअंतर्गत स्वेच्छेने जमिन योगदानाला प्रोत्साहन मिळणार असून, नैना प्रकल्पाच्या सर्वागीण विकासाला चालना मिळणार आहे.
देशातील पहिली हवाई रुग्णवाहिकेसाठी करार
देशांतर्गत व परदेशातून रुग्णांची ने आण करणार्या पहिल्या हवाई रुग्णवाहिकेसंदर्भात राज्य शासन व मॅब एव्हिएशन यांच्यात सामंजस्य करार झाला. मुख्यमंत्री ङ्खडणवीस यावेळी म्हणाले की, ही सेवा देशातील पहिली हवाई रुग्णवाहिका ठरणार असून या प्रकल्पाअंतर्गत येत्या ऑगस्टपासून तीन विमान सेवा सुरू होणार आहे. तसेच पुढील काळात प्रत्येक 500 किलोमीटरसाठी एक या प्रमाणे 10 हवाई रुग्णवाहिका सुरू करण्यात येणार आहेत. रुग्णांची तसेच प्रत्यारोपणासाठी तातडीने आवश्यक असलेल्या अवयवांची हवाई वाहतूक करण्यात येणार आहे.
* स्मार्ट सिटी, किरकोळ उद्योग, लघु व मध्यम उद्योग, परवडणारी घरे आदी क्षेत्रांचा समावेश
* देशातील पहिल्या हवाई रुग्णवाहिकेसंदर्भातील करार संपन्न
* नैना प्रकल्पासाठी खालापूर परिसरातील शेतकर्यांचा पुढाकार
* मुंबई महानगर परिसरात 6 लाख परवडणारी घरांची निर्मिती