देवीच्या साडे तीन शक्तीपीठांपैकी अर्धपीठ असलेल्या सप्तशृंगी गडावर सुरक्षा रक्षकाकडून चुकून जमिनीवर फायरिंग झाल्यामुळे आठ जण जखमी झाले आहेत. याठिकाणी दसऱ्याच्या दिवशी चंद्रभागा कुऱ्हाडीने एका घावात बोकडाचा बळी दिला जातो. त्यांनतर संस्थानच्या वतीने ३ वेळा बंदुकीतून फायरिंग केली जाते अशी प्रथा आहे. यावेळी बंदुकीत राउंड लोड करतांना ती सटकली आणि जमिनीवर आपटली. त्यातून तयार झालेल्या छऱ्यांमुळे गडावरील स्थानिक ८ भाविक जखमी झालेत. याबाबतची माहिती निवासी उपजिल्हाधिकारी रामदास खेडकर यांनी दिली.
जखमीपैकी सागर दुबे (२८) हा गंभीर जखमी झाला असून वणीच्या खासगी रुग्णालयात त्याच्यावर शस्त्रक्रिया करण्यात येत आहे. त्याच्या पायातून छरे काढण्यात आले आहेत. याशिवाय वणीमध्ये मधुकर गवळी (२८) या तरुणाला उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. रामचंद्र पवार, दिगंबर गोधडे, महेंद्र देशमुख, पद्माकर देशमुख, शरद शिसोदे, जितेंद्र अहिरे हेही जखमी झाले असून त्यांना कळवणच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.