नागपूर येथे सर्व पालकांना खडबडून जागे करणारी घटना घडली आहे. मुलांना खेळन म्हणून मोबाईल देणाऱ्या पालकांनी या घटनेकडे गांभीर्याने पाहण्याची गरज आहे. युट्यूबवर फाशी लावतानाचा व्हिडीओ पाहिला आणि त्याचे अनुकरण करण्याच्या नादात एका अल्पवयीन मुलीने आपला जीव गमावला आहे. नागपूरच्या हंसापुरी भागात ही हृदयद्रावक घटना घडली. तहसील पोलिसांनी या प्रकरणी आकस्मिक मृत्यूची नोंद केली. सहावीत शिकणाऱ्या 12 वर्षीय अल्पवयीन मुलगी ही नेहमीप्रमाणे दुपारी घरी आली. घरी ती तिच्या आईच्या मोबाईलवर खेळत बसली होती. यावेळी तिच्या 2 लहान बहिणीदेखील तिच्यासोबत होत्या. मोबाईलमध्ये युट्यूबवर व्हिडीओ पाहताना तिला गळफास घेऊन आत्महत्या करणाऱ्या मुलींचा व्हिडीओ दिसला. या व्हिडीओ विषयी तिने आईला विचारणा केली. कामात व्यस्त असलेल्या आईने व्हिडीओत दाखवल्या प्रमाणे काही नसतं, असे सांगून मुलींकडे दुर्लक्ष केलं. मात्र, या मुलींच्या मनात त्या व्हिडीओ बद्दल कुतूहल निर्माण झालं.
त्यानंतर दोन्ही लहान बहिणींना घेऊन ही मुलगी आतल्या खोलीत गेली. खोलीचे छत अगदी 6 ते 7 फुटावर असल्याने तिने एका छोट्या स्टूलच्या साहाय्याने छतावरील पंखा लटकवण्याच्या हूकला दोरी बांधली. त्या दोरीच्या सहाय्याने गळफास घेण्याच्या पद्धतीचं अनुकरण करण्याचा प्रयत्न केला. यादरम्यान अचानक खालचा स्टूल पडला आणि अल्पवयीन मुलीला गळफास लागला होता यामध्ये तिचा जीव घेला. मुलीला अशाप्रकारे गळफास लागलेला पाहून त्यांच्या आईला धक्का बसला. त्यांनी लगेच दोरी कापली. मात्र, तोपर्यंत ती बेशुद्ध झालेली होती. त्यानंतर तिला सरकारी मेयो रुग्णालयात दाखल करण्यात आलं. मात्र, तोपर्यंत उशीर झालेला होता. रुग्णालयात डॉक्टरांनी मुलीला मृत घोषित केलं. या प्रकरणी पोलिसांनी आकस्मिक मृत्यूची नोंद केली आहे. त्यामुळे अंध पालक आता तरी जागे होतील का ? मुलांचा मोबाईल बंद करतील का असा प्रश्न उभा राहिला आहे.