गेल्या अनेक दिवसांपासून चर्चेतअसलेल्या चार दिवसांचा कामाचा आठवडा या नियमाच्या शक्यतेला अखेर कामगार आणि रोजगार मंत्रालयाने दुजोरा दिला आहे. नवीन कामगार कायद्यांमध्ये करण्यात आलेल्या महत्त्वपूर्ण बदल करण्यात आले आहे.आता भारतीय कंपन्यांचे वेळापत्रक लवचिक होणार आहे.
आता भारतातही स्पेन, जर्मनी आणि जपान प्रमाणे कामाच्या ताणामुळे त्रस्त कर्मचाऱ्यांसाठी कामाचे नवीन वेळापत्रक सुरु होण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
कामगार आणि रोजगार मंत्रालयाने 12 डिसेंबर रोजी एक्स अकाउंट वर मिथबस्टर पोस्ट शेअर करत ही माहिती दिली. मंत्रालयाच्या म्हणण्यानुसार, नवीन कामगार कायद्यांमध्ये आठवड्यात कमाल 48 तास काम करण्याची मर्यादा निश्चित करण्यात आली आहे.
या 48 तासांच्या मर्यादेत राहून, कंपन्यांना लवचिक वेळापत्रक निवडण्याचा पर्याय देण्यात आला आहे.
सध्या 5 दिवसांचा आठवडा असून दररोज 8 ते 9 तास काम करावे लागत आहे.
नवीन 4 दिवसांचा आठवडा असल्यामुळे कंपनीत 12 तासांची शिफ्ट स्वीकारल्यावर कर्मचाऱ्यांना आठवड्यातून फक्त चार दिवसच काम करावे लागणार आणि 3 दिवस पगारी सुट्टी मिळणार.याचा अर्थ असा की, कर्मचाऱ्याने कंपनीत 12 तासांची शिफ्ट केल्यावर त्यांना 4 दिवसच काम करावे लागणार इतर 3 दिवस त्यांना सुट्टी मिळेल.
कामगार मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार, आठवड्यात जास्तीत जास्त 48 तास काम करण्याचे निश्चित झाले असून एखाद्या कर्मचाऱ्याने दररोजच्या तासांपेक्षा जास्त वेळ काम केल्यास त्यांना वाढीव वेतनापोटी दुप्पट रक्कम देण्यात येईल.
सध्या मुंबई, दिल्ली, बेंगळुरू, पुणे, हैद्राबाद या शहरातील बहुतेक कार्यालये 5 दिवसांचे वेळापत्रक पाळत आहे. आता नवीन कायद्यांमुळे भारतीय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या स्वरूपात मोठी सुधारणा होण्याची शक्यता आहे.