आपण सोन्या काळभोर याच्या रावण टोळीचे सदस्य असल्याचे सांगून एका अल्पवयीन मुलीला पळवून नेऊन तिच्या आई-वडिलांकडून खंडणी मागण्याची धमकी दिली. त्यापोटी तिच्याकडून रोख रक्कम, दागिने असा तीन लाख 40 हजारांचा ऐवज घेतला. त्यानंतर अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केला. याप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यातील दोघांना अटक केली आहे. प्रणव अनिल महाडिक (वय 18, रा. प्राधिकरण, निगडी), आदर्श संतोष वाघमारे (वय 21, रा. गंगानगर, निगडी) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्यासह ऋतुजा सपाटे पाटील या तरुणीवर देखील गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पीडित मुलीच्या आईने देहूरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे.
हा प्रकार 27 जानेवारी 2021 ते 28 फेब्रुवारी 2021 या कालावधीत हमर कॅफे आकुर्डी गर्ल व बॉईज हॉस्टेल, रावेत येथे घडला.पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, आम्ही सोन्या काळभोर याच्या रावण टोळीची पोरं आहोत अशी आरोपींनी फिर्यादी यांच्या 14 वर्षीय मुलीला धमकी दिली. तसेच आम्ही तुला पळवून नेऊन तुझ्या आई-बापाकडून खंडणी मागू अशी भीतीही आरोपींनी मुलीला घातली होती. त्यातूनच मुलीला दमदाटी करून, तिला मानसिक त्रास देऊन तिच्याकडून घरातील 45 हजार रुपये रोख रक्कम आणि दोन लाख 95 हजारांचे 73 ग्राम सोन्याचे दागिने असा एकूण तीन लाख 40 हजारांचा ऐवज खंडणी स्वरुपात घेतला.
त्यानंतर आरोपी प्रणव महाडिक याने पीडित मुलीवर लैंगिक अत्याचार केले असल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात एका मुलीचा देखील सहभाग आहे. देहूरोड पोलीस तपास करीत आहेत.