Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोकण रेल्वे मार्गावर अपघात : राजधानी एक्स्प्रेस सुपरफास्ट गाडीचे इंजिन रुळावरून घसरले

कोकण रेल्वे मार्गावर अपघात : राजधानी एक्स्प्रेस सुपरफास्ट गाडीचे इंजिन रुळावरून घसरले
, शनिवार, 26 जून 2021 (13:06 IST)
सिंधुदुर्ग- कोकण रेल्वे मार्गावर हजरत निजामुद्दीन-मडगाव राजधानी सुपरफास्ट स्पेशल गाडीच्या इंजिनाचे पुढील चाक रुळावरून घसरले. सुदैवानं या अपघातात कोणीही जखमी झालेलं नाही. यामुळे कोकण रेल्वेची संपूर्ण वाहतूक थांबली होती मात्र  आता इंजिन बाजूला करण्याचं काम पूर्ण झालं आहे. काही तास ठप्प झालेली वाहतूक पुन्हा सुरळीत झाली आहे. 
 
रत्नागिरी जिल्ह्यातील उक्षी आणि भोके दरम्यान करबुडे बोगद्यामध्ये पहाटे सव्वा चार वाजण्याच्या सुमारास हा अपघात घडला. राजधानी एक्सप्रेसच्या इंजिनचे एक चाक मार्गावरून उतरल्याने कोकण रेल्वेची वहातुक थांबली होती. राजधानी एक्स्प्रेस हजरत निजामुद्दीन ते मडगाव अशी धावत होती. मुंबईपासून सुमारे ३२५ किलोमीटरवर असलेल्या करबुडे बोगद्यातील ट्रॅकवर दरड कोसळल्यानं इंजिनाचं पुढील चाक रुळावरून घसरलं.
 
अपघाताची माहिती मिळताच कोकण रेल्वेची यंत्रणा घटना स्थळी तात्काळ रवाना झाली आणि इंजिन मार्गावर आणण्याचे काम सुरू झाले. अपघात बोगद्यात झाल्यामुळे कोकण रेल्वे मार्गावरील या भागातील वाहतूक काही काळ ठप्प झाली होती. इंजिन रुळावरून बाजूला करण्याचे काम पूर्ण झाल्यानं वाहतूक पुन्हा सुरू झाली आहे. या घटने मध्ये कोणत्याही प्रवाशाला दुखापत झालेली नसून सर्व प्रवासी डबे मार्गावर पूर्णतः सुरक्षित असल्याचे कोकण रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सचिन देसाई यांनी सांगितले आहे. आता नजीकच्या स्थानकावर थांबवण्यात आलेल्या गाड्याही मार्गस्थ झाल्या आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

OBC समाजाच्या राजकीय आरक्षणासाठी भाजपचं राज्यव्यापी आंदोलन