युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे गुरुवार, 4 जुलै रोजी मोहोळ तालुक्यातील सारोळे (कोठारी मळा) येथील दौर्यावर येत आहेत.
ठाकरे यांच्या दौर्याच्या नियोजनासाठी येथील विश्रामगृहात सोलापूर जिल्हा समन्वयक प्रा. शिवाजीराव सावंत यांच्या मार्गदर्शनाखाली बैठक पार पडली. या बैठकीस जिल्ह्यातील पदाधिकारी उपस्थित होते. शेतकरी पीकविमा मदत केंद्राचा आढावा व शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या संकल्पनेतून माझा महाराष्ट्र भगवा महाराष्ट्र हे अभियान राबविण्यात येणार आहे. या पार्श्वभूमीवर आदित्य ठाकरे हे यावेळी शेतकर्यांशी संवाद साधणार असून त्यांच्या अडचणी जाणून घेणार आहेत.
दरम्यान, बैठकीमध्ये सोलापूर जिल्ह्यातील सर्व गावांगावांमध्ये शिवसेनेच्या शाखा आणि गावातील प्रत्येक वॉर्डात शाखा प्रमुखांच्या निवडी करणे तसेच महिला आघाडीच्या महिला शाखा संघटक नियुक्त करण्याच्या सूचना प्रा. सावंत यांनी दिल. शिवसेनेचे हे अभियान 1 ते 26 जुलैपर्यंत सुरू आहे.
या बैठकीला ज्येष्ठ नेते साईनाथ अभंगराव, सहसंपर्कप्रमुख लक्ष्मीकांत ठोंगे-पाटील, जिल्हाप्रमुख संभाजी शिंदे, महिला आघाडी जिल्हाप्रमुख शैला गोडसे, युवा सेना जिल्हा युवा अधिकारी स्वप्निल वाघमारे, सचिन बागल, उपजिल्हाप्रमुख सूर्यकांत घाडगे, सुधीर अभंगराव, चरण चवरे, महावीर देशमुख, जयवंत माने, रवींद्र मुळे, संजय घोडके आदी उपस्थित होते.