नाशिक विनाअनुदानित खासगी शाळेच्या वसतिगृहात राहणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनींना पर्यटकांसमोर नाचवण्याचा गंभीर प्रकार उघडकीस आल्यानंतर आता या शाळेच्या आवारात मद्याच्या व अौषधांच्या बाटल्या तसेच सलाइनचा खच असून त्याची सखोल चौकशी करण्याची मागणी एल्गार संघटनेचे भगवान मधे यांनी केली आहे.
याप्रकरणी पोलिसांनी दिलेली माहिती अशी, चिखलवाडी (ता.त्र्यंबकेश्वर) येथील इंग्रजी माध्यमचे निवासी सर्वहारा परिवर्तन केंद्र येथे आदिवासी समाजाच्या २२ मुली शिक्षण घेतात. संस्थाचालक राजू ऊर्फ बंदीराज नाईक आणि शिक्षिका माधुरी गवळी मुलींना बळजबरीने शाळेच्या आवारातील कॅन्टीनच्या मोकळ्या आवारात पारंपरिक नृत्य करण्यास भाग पाडत असल्याचा आरोप पीडित पाच मुलींनी केला आहे.
वाडीवऱ्हे पोलिस ठाण्यात संशयित संस्थाचालक नाईक आणि शिक्षिका गवळी यांच्याविरोधात बालकांचे संरक्षण कायदा अधिनियम आणि अॅट्राॅसिटी कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
महिला बालहक्क आयोग वसतिगृहात : महिला बालहक्क आयोगाच्या सदस्या सायली पालखेडकर, तहसीलदार आणि उपअधीक्षक भामरे यांनी वसतिगृहाला बुधवारी भेट देत मुलींकडून माहिती घेतली.
चिखलवाडीला छावणीचे स्वरूप चिखलवाडीच्या घटनेची शासनाने गंभीर दखल घेतली असून पोलिस अधीक्षक शहाजी उमाप यांनी अतिरिक्त पोलिस बंदोबस्त तैनात केला आहे.