Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

अजित पवार म्हणतात, "मी गृहमंत्रिपद मागितलं, पण वरिष्ठांना वाटलं, हा हाताबाहेर जाईल'

Ajit Pawar
, शनिवार, 24 सप्टेंबर 2022 (12:51 IST)
"मी गृहमंत्रिपद मागितलं, पण दिलं नाही," अशी खंत महाराष्ट्राचे विरोधी पक्षनेते आणि माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी व्यक्त केली.
 
विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या कार्यकारिणीची आढावा बैठक संपन्न झाली. या बैठकीत आपल्या भाषणात अजित पवार यांनी मनातील इच्छा कार्यकर्त्यांसमोर बोलून दाखवली.
 
"जेव्हा जेव्हा मी उपमुख्यमंत्री झालो, तेव्हा तेव्हा मी वरिष्ठांकडे गृहमंत्रिपद मागितलं. पण मला दिलं नाही. एकदा अनिल देशमुखांना दिलं आणि त्यांचं मंत्रिपद गेल्यानंतर वळसे पाटलांना दिलं. दोन्ही वेळी मी गृहमंत्रिपद मागितलं. पण वरिष्ठांनी मला काही गृहमंत्रिपद दिलं नाही", अशी खंत अजित पवार यांनी हसत हसत बोलून दाखवली.
 
अजित पवार यांचं पुण्यात कार्यकारिणी मेळाव्यात भाषण सुरु असताना मंचावरील एका पदाधिकाऱ्याने दादांकडे कुठलीशी मागणी केली.
 
त्यावर अजित पवार म्हणाले, "माझ्या ओठात एक आणि पोटात एक असं नसतं, हे सगळ्यांना माहिती आहे. आपण सत्तेत असताना मला गृहमंत्रिपद द्या, असं वरिष्ठांना मी सतत म्हटलं. पण मला काही गृहमंत्रिपद दिलं नाही... जेव्हा जेव्हा उपमुख्यमंत्री झालो तेव्हाच गृहमंत्री करा म्हटलं, पण वरिष्ठांनी तसा निर्णय काही घेतला नाही
 
"मागे अनिल देशमुख यांच्यावेळीच मी गृहमंत्रिपदाची मागणी केली पण त्यावेळीही मला दिलं नाही. त्यांचं गेल्यावरही मागितलं तर त्यावेळी दिलीप वळसे पाटलांकडे गृहमंत्रालयाची धुरा दिली गेली. माझ्याकडे गृहमंत्रालयाचा कार्यभार दिल्यानंतर मी त्यांचंही ऐकणार नाही, असं वरिष्ठांना वाटतं. पण ते खरंय, कारण मला जे वाटतं ते मी करतो. त्यात राष्ट्रवादीचा जरी चुकला आणि दादा जरा पोटात घ्या म्हणलात, तरी पोटात नाही ना ओठात नाही," असं अजित पवार म्हणताच सभागृहात खसखस पिकली.
 
ते माझ्या कार्यकर्त्यांसाठी बोललो, मीडियासाठी नाही - अजित पवार
यावर अजित पवार यांनी नंतर स्पष्टीकरण दिलं. अजित पवार म्हणाले, "कार्यकर्ते म्हणाले, गृहमंत्रिपद तुम्हाला पाहिजे, तुम्हाला पाहिजे. मग मी म्हटलं की, ते मलाही पाहिजे होतं, पण नाही मिळालं, तर काय करता? सभेत कार्यकर्ते थकून जातात, तेव्हा बदल होण्यासाठी ते बोललो. ते मीडियासाठी बोललो नाही, माझ्या कार्यकर्त्यांसाठी होतं. आणि तसंही तो पक्षाअंतर्गत प्रश्न होता. आमच्या वरिष्ठांनी कुठलं डिपार्टमेंट कुणाला द्यावा, हा ज्यांचा-त्यांचा अधिकार आहे."
 
"सर्व खाती महत्त्वाची असतात. राज्यमंत्रिपदापासून शेवटच्या मंत्रिपदापर्यंत मी जबाबदारीनं काम केलं. शेवटी तुम्ही किती आवडीनं काम करता, हे महत्त्वाचं असतं," असंही अजित पवार म्हणाले.
 
अजितदादांच्या याच नाराजीवर नागपूर दौऱ्यावर असलेल्या वळसे पाटलांना विचारलं असता त्यांनीही वरिष्ठांच्या कोर्टात अजितदादांच्या 'नाराजीचा चेंडू' ढकलला.
 
अजितदादांच्या नाराजीवर नागपूरचे प्रभारी म्हणून नागपूर दौऱ्यावर आलेल्या दिलीप वळसे पाटील यांना विचारलं असता त्यांनी सावध प्रतिक्रिया दिली. 'त्यावेळी वरिष्ठांनी तो निर्णय कोणत्या परिस्थितीत घेतला, हे मला सांगता येणार नाही आणि त्यावर मी काही बोलू इच्छित नाही', असे सांगत त्यांनी अजितदादांच्या नाराजीवर बोलण्याचे टाळले. त्यांची सावध प्रतिक्रिया पाहता त्यांनी 'वरिष्ठ' आणि अजितदादांचेही मन राखल्याची नागपूरमध्ये चर्चा होती.
 
शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंच्या नेतृत्त्वात जेव्हा काँग्रेस, राष्ट्रवादी आणि शिवसेनेचं महाविकास आघाडी सरकार स्थापन झालं, तेव्हा राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख यांना गृहमंत्रिपद देण्यात आलं. शिवाजी पार्कात झालेल्या शपथविधीवेळी अजित पवारांना शपथ देण्यात आली नव्हती. नंतर पहिल्या मंत्रिमंडळ विस्तारात अजित पवारांना मंत्रिमंडळात घेण्यात आलं. मात्र, त्यावेळी त्यांच्याकडे उपमुख्यमंत्रिपद आणि अर्थमंत्रिपद देण्यात आलं.
 
तर अनिल देशमुख हे आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी तुरुंगात गेल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते दिलीप वळसे-पाटील यांना गृहमंत्रिपद देण्यात आलं.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सहा महिन्याच्या चिमुरड्याचा अपघातात दुर्दैवी मृत्यू पुण्यातील घटना