जालना जिल्ह्यातील भोकरदन तालुक्यात लग्न झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी दागिने घेऊन नवरी पळून गेल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तब्बल 2 लाख 90 हजारांचे दागिने या नवरीने गायब केले असून या मागे मोठी टोळी असल्याची शक्यता आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एका नववधूने लग्नाच्या अवघ्या दोन दिवसातच दागिने घेऊन पळून जाण्याची घटना उघडकीस आली. शेतकरी राजू दौलत काकडे यांचा मुलगा ज्ञानेश्वर याचा विवाह जमत नसल्याने त्यांनी एका जालना येथील तुकाराम शिंदे यांच्या माध्यमातून हिंगोली शहरातील दिलीप जाधव यांची मुलगी सोनू या तरुणीशी त्यांचा विवाह ठरवला.
या लग्नासाठी तुकाराम शिंदे याने 3 लाख रुपयांची मागणी केली होती. अखेर 2 लाख 90 हजार रुपयांवर हा व्यवहार पूर्ण झाला. पैसे दिल्यानंतर दोन दिवसांपूर्वी शेलूद गावातील वाढोना परिसरातील भूयारेश्र्वर मंदिरात वैदिक पद्धतीने दोघांचा लग्न ही झाला. पण, लगनाच्या दुसऱ्याच दिवशी नववधू अंगावरील दागिन्यांसह कुणालाही न सांगता घरातून निघून गेली. या प्रकरणी राजू दौलत काकडेच्या फिर्यादी वरून नववधू आणि 2 मध्यस्थीसह चौघांवर पारध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.