Pandhari Sheth Phadke Passed Away: महाराष्ट्रातल्या बैलगाडा शर्यतीतील प्रसिद्ध नाव आणि गोल्डनमॅन अशी ओळख असणार्या पंढरी शेठ फडके यांचे हृदयविकाराचा झटक्याने निधन झाले. दुपारी आपल्या ऑफिसवरून घरी जाताना कारमध्ये त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंढरीनाथ फडके महाराष्ट्र बैलगाडा शर्यत असोसीएशनचे अध्यक्ष होते. पंढरीशेठ यांच्या निधनाने पनवेलच्या विहिगर येथील परिसरात शोकाकूल वातावरण आहे.
मराष्ट्रातील प्रसिद्ध गाडामालक अशी पंढरी शेठ फडके यांची ओळख होती. त्यांना आपल्या वडिलांच्या काळापासून बैलगाडा शर्यतीत आवड होती. महाराष्ट्रात बादल हा त्यांचा बैल देखील प्रसिद्द आहे. बैलगाडा प्रेमी असण्यासोबत गोल्डमॅन म्हणूनही ते राज्यात प्रसिद्ध होते.
त्यांच्या दावणीत 40 ते 50 शर्यतीचे बैल असल्याचे बोललं जाते. या बैलांना महिन्याला लाखभर रुपयांची खाद लागत असल्याचे देखील सांगितले जाते. राज्यातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमर मिळवून देण्यामध्ये त्यांचा मोठा वाटा होता.
पंढरीशेठ फडके हे शेतकरी कामगार पक्षाचे नेते ही राहिले. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला होता. दरम्यान 2022 मध्ये कल्याणमध्ये राहुल पाटील यांच्यावर गोळीबार प्रकरणी पंढरीनाथ फडके यांना अटक झाली होती या प्रकरणात त्यांना काही महिन्यांपुर्वी जामिनही मिळाला होता.
2020 मध्येही पनवेलमध्ये एका क्रिकेट मॅच दरम्यानही मैदानात एन्ट्री करताना त्यांनी हवेत गोळीबार केला होता. एकूण 4 राऊंड त्यांनी हवेत फायर केले त्यांच्यासोबत असलेल्या समर्थकाने त्यांच्यावर नोटाही उधळल्या होत्या. याप्रकरणी त्यांच्यावर गुन्हा देखील दाखल झाला होता.
बैलगाडा शर्यतीच्या मैदानात त्यांच्या वेगळी एन्ट्रीची, त्यांच्या सोन्याच्या दागिन्यांची आणि गाडीच्या टपावर बसून शर्यत बघण्याच्या निराळ्या स्टाईलची चांगलीच चर्चा असायची. पंढरीशेठ यांच्या हटके डान्सचे व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाले होते. लोकप्रिय असलेल्या पंढरीशेठ यांच्या मृत्यूने हळहळ व्यक्त केली जात आहे.