राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जेष्ठ प्रचारक, वनवासी कल्याण आश्रमाचे पुर्व संघटन मंत्री गजानन यशवंत तथा बाळासाहेब दिक्षित यांचे मंगळवारी मध्यरात्री एक वाजता श्री गुरुजी रुग्णालयात निधन झाले. ते 93 वर्षांचे होते. नाशिक मधील संघाचे सर्वात जेष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांना मान होता, अत्यंत नामवंत व्यक्ती म्हणून त्यांची ओळख होती, आज सकाळी 11 वाजता त्यांच्यावर नाशिक अमरधाम येथे अंत्यसंस्कार झाले, मागील वर्षी 5 नोव्हेंबर रोजी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत नाशिक मध्ये आले तेव्हा त्यांनी बाळासाहेब यांची कृषी नगर येथे वनवासी कल्याण आश्रमातच वास्तव्याला असलेल्या बाळासाहेबांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली होती.
नाशिक मधील जेष्ठ स्वयंसेवक म्हणून त्यांना मान होता. 66 वर्षे त्यांनी संघ कार्यासाठी दिली होती,त्यांनी स्वयंसेवक म्हणून कामाची सुरुवात उस्मानाबाद येथून केली होती, 1958 पासून 15 वर्षे तेथे त्यांनी प्रतिकूल परिस्थितीत संघ विचार रुजवले. आणि उस्मानाबादसह मराठवाड्यात संघ शाखांचे कामकाज सुरु केले,संघ विचार रुजविताना त्यांनी संघ हा विशिष्ट घटकांची संस्था असल्याचे खोडून काढताना सर्व समाजाला एकत्रीत आणल्याने त्यांना संघात समरसता दूत देखील म्हंटले जात. 1977 मध्ये आणीबाणीच्या कालावधीत त्यांनी तुरुंगवास देखील भोगला. 1978 साली स्थापन झालेल्या वनवासी कल्याण आश्रमाचे ते घटनामंत्री झाले. 1992 मध्ये लातूर येथे झालेल्या भूकम्पानंतर किल्लारी येथे पुनर्वसन कार्यात त्यांचा मोठा सहभाग होता. त्यांचा प्रचंड वाचन व्यासंग होता.