नाशिक शहरातील सुपर स्पेशालिटी हॉस्पिटलचा परवाना नाशिक महापालिकेच्या वैद्यकीय विभागाने रद्द केला आहे. हे हॉस्पिटल डॉ. अनिल कासलीवाल यांचे आहे. गंगापूररोडवरील बॉस्को सेंटर या इमारतीमध्ये हे हॉस्पिटल आहे.
महापालिकेचे माजी नगरसेवक अनिल चौघुले यांच्या जागेवर बॉस्को सेंटर उभारण्यात आले आहे. या जागेच्या करारासंदर्भात वाद निर्माण झाल्याने चौघुले यांनी गंगापूर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दिली आहे. चौघुले यांनी दिलेल्या तक्रारीनुसार, २०१६ पर्यंत चौघुले हे परदेशात गेले होते. त्याचवेळी मे. जॅझ डेव्हलपर्सने डॉ. अनिल कासलीवाल, विशाल कासलीवाल, प्रियंका कासलीवाल यांच्या नावे जागेचा करार केला. याच करारानुसार, कासलीवाल यांनी सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल उभारले. पूर्वीचा करार असतानाही नवा करार परस्पर करण्यात आला. चौघुले यांनी पोलिसात दिलेल्या तक्रारीबाबत महापालिकेच्या वैद्यकीय विभागाला कळविले. त्याची दखल घेत मनपा वैद्यकीय विभागाने कासलीवाल यांच्या हॉस्पिटलचा ना हरकत दाखला रद्द केला आहे.