राज्यात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून अर्थसंकल्पीय अधिवेशनात भाजपाने आक्रमक भूमिका घेतल्याचे दिसून आले. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी महाविकास आघाडी सरकारला या मुद्द्यावरून लक्ष केले होते. अधिवेशनात शेतकऱ्यांच्या वीज तोडणीसंदर्भात मोठा निर्णय जाहीर केला आहे. ऊर्जामंत्री डॉ. नितीन राऊत यांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीची कारवाई तात्पुरत्या स्वरूपात थांबवत असल्याची घोषणा केली. त्यानंतर विरोधकांनी त्यांच्या या निर्णयाचे स्वागत केले. मात्र, महाविकासआघाडी सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए, अशा प्रकारचं ट्विट भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी केलं आहे.
मविआ सरकार झुकती है, बस झुकानेवाला चाहिए!. अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून भाजपने लावून धरलेल्या शेतकऱ्यांच्या वीजतोडणी संदर्भात अखेर मविआ सरकारला नमावेच लागले. वीजतोडणी तत्काळ थांबवण्याचे ऊर्जामंत्र्यांचे आदेश. गोरगरीब शेतकऱ्यांसोबत भाजपा सदैव खंभीरपणे उभी आहे, असं ट्विट करत पाटलांनी महाविकास आघाडी सरकारला फिल्मी स्टाईलने टोला लगावला आहे.