Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

तुम्ही काहीतरी लपवताय; संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले!

तुम्ही काहीतरी लपवताय; संजय राऊत मुख्यमंत्र्यांना थेट बोलले!
, बुधवार, 22 जुलै 2020 (12:24 IST)
'तुम्ही काहीतरी लपवताय' हे वाक्य आहे शिवसेनेचे खासदार संजय राऊत यांचं! हे वाक्य त्यांनी विरोधी पक्षाच्या कुणा नेत्यासाठी वापरलेलं नाही तर राज्याचे मुख्यमंत्री व शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना उद्देशून ते असं म्हणाले आहेत. तेही जाहीर मुलाखतीत. 'संजय राऊत हे नेमकं कोणत्या लपवाछपवीबद्दल बोलत आहेत,' याची चर्चा आता राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. 
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यानंतर संजय राऊत यांनी मुख्यमंत्री ठाकरे यांची मुलाखत घेतली आहे. येत्या २५ व २६ जुलै रोजी शिवसेनेचं मुखपत्र 'सामना'मध्ये ही मुलाखत प्रसिद्ध होणार आहे. या मुलाखतीबद्दल राऊत यांनी आज एक व्हिडिओ ट्विट केलं आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची दिलखुलास मुलाखत असं संजय राऊत यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलं आहे. व्हिडिओच्या ट्रेलरमध्ये ते मुख्यमंत्र्यांना काही प्रश्न विचारत आहेत व तुम्ही काहीतरी लपवत आहात, असंही बोलताना दिसत आहेत. त्यामुळं अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. 
 
उद्धव ठाकरे यांनी 'सामना'ला यापूर्वी अनेक मुलाखती दिल्या आहेत. मात्र, त्या मुलाखती एका पक्षाचे प्रमुख म्हणून होत्या. मुख्यमंत्री झाल्यानंतरची त्यांची ही पहिलीच मुलाखत आहे. त्यात राज्य सरकारबद्दलचे अनेक प्रश्न आहेत. संजय राऊत व 'सामना'च्या ट्विटर हँडलवरून ट्विट करण्यात आलेल्या व्हिडिओतून त्याचा अंदाज सहज लावता येतो. या व्हिडिओतील प्रश्नांमुळं मुलाखतीबद्दल उत्सुकता निर्माण झाली आहे.तुमच्या डोक्यावरचे केस कमी झालेले दिसतात, हा सहा महिन्यांचा परिणाम आहे का? सरकारच्या सहा महिन्याच्या काळाकडं तुम्ही कसं पाहता? मुंबईच्या रस्त्यावर वडापाव कधी मिळणार? महाराष्ट्रात सैन्याला पाचारण करावं असं आपल्याला कधी वाटलं होतं का? करोनाच्या काळात आपण मंत्रालयात कमीत कमी गेलात, असं का? अंतिम वर्षाच्या परीक्षेचं काय?,' असे अनेक प्रश्न या मुलाखतीत उद्धव ठाकरे यांना विचारण्यात आले आहेत. त्यावर त्यांनी नेमकी काय उत्तरं दिली आहेत, हे प्रत्यक्ष मुलाखतीतून समजणार आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सचिन पायलट यांना ज्यांच्यामुळे कोर्टात जावं लागलं ते सीपी जोशी कोण आहेत?