मुंबई-पुणे दरम्यान धावणार्या शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. 1 मे महाराष्ट्र दिनाचा मुहूर्त साधत ठाणे ते पुणे महामार्गावर ई-शिवनेरी बस उतरण्याचा एसटी महामंडळाचा मानस आहे. त्यामुळे आता एसटी महामंडळाच्या ताफ्यात ई-शिवनेरी बस नव्याने दाखल होणार आहेत. सध्या असलेल्या शिवनेरीच्या तिकीटाच्या तुलनेत ई शिवनेरीचे तिकीट कमी असणार आहे. महाराष्ट्र दिन अर्थात 1 मे पासून ही नवी सेवा प्रवाशांच्या सेवेत असणार आहे.
दरम्यान इलेक्ट्रिक शिवनेरी बसमध्ये संपूर्ण वातानुकूलित, मोबाईल चार्जिंगसह अत्याधुनिक इन्फोटेन्मेंटची सुविधा मिळणार आहे. तर एकदा बॅटरी चार्ज झाल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमता या बसमध्ये आहे. सध्याच्या शिवनेरीच्या तिकीट दराच्या तुलनेत या गाड्यांचे भाडे कमी असणार आहे. ठाणे-पुणे महामार्गावर धावणाऱ्या बसचे भाडे 350 रुपये असण्याची शक्यता आहे.
तर डिझेल बसच्या तुलनेमध्ये इलेक्ट्रिक बस चालवण्याचा खर्च कमी आहे. सध्या भारतामध्ये फेम योजने अंतर्गत राज्य परिवहन महामंडळामध्ये काही बस दाखल करुन घेण्यात आल्या आहेत. शिवनेरी ही एसटी महामंडळाच्या ताफ्यातील प्रीमियम बस सेवांपैकी एक आहे. व्होल्वो श्रेणीतील ही बस आरामदायी आणि वेगवान असल्याने अनेक जण त्याला प्राधान्य देतात. वरचे वर मुंबई पुणे प्रवास करणारे अनेक जण नियमित शिवनेरीने फिरतात. त्यामुळे हा प्रवासी कायम राहण्यासाठी ई-बसचे नामकरण ई-शिवनेरी करण्यात आले आहे.
काय आहे ई-शिवनेरीची वैशिष्ट्ये?
ई शिवनेरी बसची क्षमता 43 प्रवाशांची
एकदा बॅटरी पूर्ण चार्ज केल्यानंतर 400 किमीचा टप्पा पार करण्याची क्षमात
ई शिवनेरी संपूर्ण वातानुकुलित बस
आरामदायी आसन व्यवस्था
मोबाईल चर्जिंगची सोय
बॅग ठेवण्यासाठी स्वतंत्र व्यवस्था
दरम्यान पेट्रोल-डिझेलच्या किमतीने उच्चांक गाठल्यामुळे येत्या काळात या इलेक्ट्रिक बसचा सर्वसाधारण नागरिकांना फायदा होणार आहे. शिवाय तिकीटांच्या दरात देखील तफावत जाणवण्याची शक्यता आहे.
Edited By - Ratnadeep ranshoor