दोन वर्षांपूर्वी ज्यांनी हनुमान चालिसा पठनाला विरोध केला, त्यांच्या सत्तेच्या लंकेचे हनुमानाच्या कृपेने दहन झाले आणि राज्यात सत्तापरिवर्तन झाले. श्रीराम प्रभू आणि हनुमानाच्या आशीर्वादाने सर्वसामान्यांच्या मनातले सरकार स्थापन झाले, अशा शब्दात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे नाव न घेता त्यांच्यावर टीका केली. येथील मालखेड मार्गावरील हनुमान गढी येथे प्रवचनकार पंडित प्रदीप मिश्रा यांच्या शिवमहापुराण कथावाचन कार्यक्रमाला मुख्यमंत्र्यांनी शनिवारी भेट दिली. यावेळी बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी विरोधकांवर टीकेची संधी सोडली नाही.
शिंदे म्हणाले, खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांना केवळ हनुमान चालिसा पठनाचा प्रयत्न केला म्हणून ज्यांनी 14 दिवस तुरूंगात पाठवले, त्यांचे सरकार बदलण्याचे काम मी केले. म्हणून खोट्या अहंकाराची आणि सत्तेची हवा कधीही डोक्यात जाता कामा नये. अयोध्येला आपण सर्वांना 22 तारखेला जायचे आहे. बाळासाहेब ठाकरे यांचे विचार घेऊन आपण पुढे चाललो आहोत. बाळासाहेबांनी हिंदुत्वाचा झेंडा सतत फडकवत ठेवला. परंतु काही लोकांनी सत्तेसाठी अहंकारापोटी तो झेंडा खाली ठेवला, अशी टीका त्यांनी केली.
काही लोक बाळासाहेब ठाकरे यांचे हिंदुत्वाचे विचार विसरले, पण आम्ही बाळासाहेबांचे विचार कधीही सोडणार नाही. कुठलीही तडजोड आम्ही करणार नाही. ज्या राज्यामध्ये हनुमान चालिसाला विरोध होतो, ते राज्य काय कामाचे, ज्या ठिकाणी श्रीरामाला विरोध ते राज्य काय कामाचे, अयोध्येला श्रीरामांचे भव्य मंदिर उभारले जावे, ही कोट्यवधी हिंदू बांधवांची इच्छा होती. अयोध्येत राम मंदिर व्हावे, अशी बाळासाहेब ठाकरे यांची इच्छा होती. ती इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पूर्ण केली आहे. काही लोक मस्करी करीत होते, टिंगल करीत होते. म्हणत होते, मंदिर वही बनाएंगे, तारीख नही बताएंगे, पण नरेंद्र मोदी यांनी मंदिर बनवून दाखवले. यावेळी मंत्री संजय राठोड, खासदार नवनीत राणा, आमदार रवी राणा आदी उपस्थित होते.
Edited by -Ratnadeep Ranshoor