राज्यातील पूरग्रस्त शेतकऱ्यांना ३६५ कोटीवरून १० हजार कोटी रुपयांची मदत करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला. यावर राज्य शासनाने शेतकऱ्यांची फसवणूक केल्याचे आरोप होत असून या विरोधात आंदोलनाची तयारीही सुरू झाली आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी म्हणाले, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शेतकऱ्यांना अंतर देणार नाही असे तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी पूरग्रस्तांना वाऱ्यावर सोडणार नाही, असे आश्वासन दिले होते. तथापि २०१९ सालच्या महापुराच्या तुलनेत आता मिळालेली मदत अत्यल्प आहे. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या विश्वासाला तडा दिला आहे, अशी टीका केली आहे.
माजी कृषिमंत्री सदाभाऊ खोत यांनी राज्य शासनाने मोठ्या रकमेची पोकळ घोषणा केली आहे पण प्रत्यक्षात शेतकऱ्यांच्या पदरात काहीच पडणार नाही. मुख्यमंत्री शब्द पाळतील असे काही शेतकरी नेते दावा करत होते. आता तरी त्यांनी वास्तव समजून घेऊन शेतकर्यांच्या बाजूने उतरावे, असा टोला राजू शेट्टी यांना लगावला. राज्य शासनाच्या तोकड्या मदतीच्या निर्णयाची राज्यभर होळी २१ ऑक्टोंबर रोजी करण्यात येणार आहे.