पणजी: गोव्याला मुसळधार पावसाने झोडपून काढले आणि राज्यातील जनजीवन विस्कळीत झाले. पणजीसह सर्वत्र मुसळधार पावसामुळे पूरसदृष्य स्थिती उद्भवली. सत्तरीतील म्हादई व इतर नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली. म्हापसा व आसपासच्या परिसरातही तुफान पावसामुळे मोठय़ा प्रमाणात शेती पाण्याखाली गेली.
अनेक ठिकाणचे रस्ते पाण्याखाली गेले. अनमोड घाटात दरड कोसळय़ाने वाहतूक ठप्प झाली. पेडणे तालुक्यालाही मुसळधार पावसाचा फटका बसला. मोपा विमानतळ प्रकल्पातून मोठय़ा प्रमाणात पावसाचे पाणी खाली आल्याने आसपासच्या घरे, मंदिरांमध्ये, शेतीमध्ये पाणी घुसले. राज्यभरात सर्वत्र शेतीमध्ये लालमाती मिश्रीत पाणी उतरल्याने शेती धोक्यात आली.
कमी दाबाच्या पट्टय़ाचा परिणाम गोव्यावर झाला. हवामान खात्याने मुसळधार पावसाचा इशारा दिला होता. मात्र अलिकडे मुसळधार पावसाचे इशारे देऊन देखील तशा पद्धतीने पाऊस पडला नाही. त्यामुळे यावेळीदेखील असा प्रकार होऊ शकतो हा सर्वसामान्य जनतेचा समज फोल ठरला आणि हवामान खात्याचा इशारा सत्यात उतरला. साधारणतः मध्यरात्रीनंतर 2.30 वा. पासून पावसाचे सर्वांनाच उग्र स्वरुप पाहायला मिळाले.
जुलैमध्ये मुसळधार पाऊस पडतो त्याचा प्रत्यय आता जनतेला यायला लागला असून सोमवारी पावसाचा कहर झाला. सर्वत्र मुसळधार पावसाने गोव्याला झोडपून काढले. पहाटेपासून जोरदार पावसामुळे सत्तरी परिसरातील अनेक नद्यांच्या पाण्याची पातळी वाढली व पूरसदृष्य स्थिती निर्माण झाली. सत्तरीतील अनेक रस्ते सकाळी पाण्याखाली गेले.