राज्यातील विद्यापीठे आणि संलग्न महाविद्यालयांमधील पदवी प्रदान समारंभ बंद केले जाणार आहेत. पुढील काही दिवसांत त्याबाबत सूचना दिली जाईल. विद्यार्थ्यांना त्यांचे पदवी प्रमाणपत्र थेट डिजीलॉकरमध्ये उपलब्ध होणार असल्याचे सूतोवाच उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांनी केले.
उच्च व तंत्र शिक्षणातील प्रवेश प्रक्रिया, शिष्यवृत्ती अशा विषयांबाबत पाटील यांनी माहिती दिली. विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) पदवी प्रमाणपत्र विद्यार्थ्यांना डिजीलॉकरमध्ये उपलब्ध करून देण्याच्या सूचना दिल्या आहेत. विद्यार्थी डिजिलॉकरद्वारे प्रमाणपत्रे कुठेही आणि कधीही उपलब्ध करून घेऊ शकतात. याबाबतची अधिसूचना लवकरच प्रसिद्ध करण्यात येईल, असे पाटील यांनी सांगितले.
कोरोना काळातील आर्थिक अडचणींमुळे शुल्क प्रतिपूर्तीवर परिणाम झाला. मात्र प्रलंबित शुल्क प्रतिपूर्तीची रक्कम शिक्षण संस्थांना देण्याबाबत कार्यवाही सुरू आहे. तसेच विद्यार्थी शुल्क प्रतिपूर्तीबाबत स्वतंत्र संकेतस्थळ तयार करण्यात आल्याची माहितीही पाटील यांनी दिली.
Edited by : Ratnadeep Ranshoor