अंबिल ओढा येथील वसाहतीमधील काही घरांवर मागील आठवड्यात महापालिकेच्या अतिक्रमण पथकाने कारवाई करण्यात आली होती. यात काही घरंही पाडण्यात आली. या कारवाईच्या निषेधार्थ आज पुणे महापालिकेसमोर स्थानिक नागरिकांनी ठिय्या आंदोलन केले. या आंदोलनकर्त्यांची खासदार सुप्रिया सुळे यांनी भेट घेतली. त्यानंतर प्रसारमाध्यमांशी बोलताना सुळे म्हणाल्या, नागरिकांवर अन्याय होऊ देणार नाही. जो अधिकारी किंवा बिल्डर म्हणत असेल की, मी अजित पवार यांचा माणूस आहे. कुणी कारवाई करू शकत नाही, असं त्या दिवशी म्हणाला असेल, तर त्याबाबत पुरावे द्यावेत. मी स्वतः पोलिसांकडे तक्रार करेन, अशी ग्वाही यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली.
यावेळी कार्यकर्त्यांनी अजित पवार मुर्दाबाद, पालकमंत्री राजीनामा द्या, अशा घोषणा दिल्या. तसंच “निकम बिल्डर आणि महापालिकेच्या माध्यमातून कारवाई करण्यात आली. अजित पवार यांचा माणूस आहे अशी धमकी देऊन त्यावेळी आमच्यावर कारवाई झाली. आम्हाला आमची घरे द्या,” अशी मागणी सुप्रिया सुळे यांच्याकडे त्यांनी केली. त्यावर सुप्रिया सुळे म्हणाल्या, “कुणावरही अन्याय होणार नाही. जो कुणी असं म्हणाला असेल की, अजित पवार यांचा माणूस आहे आणि कारवाई होणार नाही. त्याबद्दलचे पुरावे मला द्या, मी स्वतः पोलिसांत तक्रार करेन, अशी ग्वाही सुप्रिया सुळे यांनी आंदोलनकर्त्याना यावेळी दिली.