इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट (IIM) मुंबईत सुरू करण्याचा निर्णय केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत घेण्यात आला आहे. दिल्लीत केंद्रीय मंत्रीमंडळाची बैठक पार पडली. त्यावेळी IIMबाबत निर्णय घेण्यात आला. हे विधेयक केंद्रीय मंत्रीमंडळाच्या बैठकीत मंजूर झाल्यानंतर आता संसदेच्या पावसाळी अधिवेशनात या विधेयकाला मंजुरी देण्यात येणार आहे.
पवईतील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ इंडस्ट्रिअल इंजिनिअरींग या संस्थेत आयआयएम सुरू करण्याची केंद्रीय मंत्रिमंडळाने मंजुरी दिली आहे. त्यामुळे एमबीएच्या जवळपास साडेतीनशे जागांसाठी प्रवेश दिला जाणार असल्याचं सांगण्यात येत आहे. देशातील 21 आणि महाराष्ट्रातील दुसरी IIM शिक्षण संस्था म्हणून मुंबईच्या IIMकडे पाहिलं जाणार आहे.
देशाची आर्थिक राजधानी असल्यानं मुंबई नेहमीच आयआयएमसारख्या टॉप मॅनेजमेंट संस्थेची गरज भासत असते. तसेच वेळोवेळी अनेक बड्या उद्योगपतींकडून आयआयएमसारख्या राष्ट्रीय स्तरावरील संस्थेची मागणी करण्यात येते. त्यानंतर यावर विचार करण्यासाठी केंद्र सरकारकडून हालचाली सुरू झाल्या होत्या आणि त्यानंतर आता हे महत्त्वाचं पाऊल उचलण्यात आलं आहे.
Edited By - Ratnadeep Ranshoor