लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजप पक्षाचा दारुण पराभव झाला. दिल्लीत राज्यातील भाजपच्या वरिष्ठ नेत्यांची बैठक होणार असून या बैठकीत राज्यातील लोकसभा निवडणुकीतील पराभवा बाबत चर्चा होणार आहे. या बैठकीत देवेंद्र फडणवीस यांच्या भवितव्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीसाठी राज्यातील भाजपचे प्रमुख नेते उद्या दिल्लीसाठी रवाना होणार आहे. गृहमंत्री अमितशहा यांची भेट होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या बैठकीला देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, आशिष शेलार, खासदार अशोक चव्हाण, मंत्री गिरीश महाजन उपस्थित राहणार आहे.
याआधी लोकसभा निवडणुकीच्या निकालासंदर्भात गेल्या शुक्रवारी प्रदेश भाजपची मोठी बैठक झाली. या बैठकीला केंद्रीय मंत्री पियुष गोयल, रक्षा खडसे, भाजपचे राष्ट्रीय सरचिटणीस विनोद तावडे यांच्यासह अनेक दिग्गज नेते उपस्थित होते.
या बैठकीत देवेंद्र फडणवीस म्हणाले की, राज्यात मोठ्या प्रमाणात ध्रुवीकरण झाले असून त्यामुळे लोकसभा निवडणुकीत आमच्या जागा कमी झाल्या. संविधान बदलणार असल्याचा खोटा प्रचार विरोधकांनी केला.
पहिल्या तीन टप्प्यात खोट्या प्रचाराची तीव्रता खूप जास्त होती, त्यामुळे 24 पैकी फक्त 4 जागा जिंकता आल्या. त्यानंतर आम्ही त्याला प्रतिसाद देऊ लागलो म्हणून 24 पैकी 13 जागा जिंकल्या.