सांगली महानगरपालिका निवडणुकीत लोकांना खरेदी करण्याची भाषा भाजपचे मंत्री करीत आहेत. येथील सामान्य माणूस स्वाभिमान गुंडाळून भाजपबरोबर जाणार नाही. येत्या निवडणुकीत भाजपला योग्य जागा दाखवेल, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली. उत्कर्ष हडको कॉलनी, संजयनगर येथे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची जनसंवाद बैठक झाली, त्यावेळी ते बोलत होते.
जयंत पाटील म्हणाले की केंद्रात, राज्यात चार वर्षे सत्तेत असलेल्या भाजपने सांगली महापालिका क्षेत्राच्या विकासाचे एकही काम केले नाही. मात्र लोकांना खरेदी करून निवडणुका जिंकण्याची भाषा करू लागले आहेत. निवडणूक जाहीर झाल्यानंतर भाजपचे डझनभर मंत्री गल्लोगल्ली फिरतील. त्यांच्या फिरण्याने आणि पोकळ आश्वासनांनी विकास होत नाही. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचंड आश्वासने दिली. पण महागाई कमी झाली नाही. बेरोजगारी कमी झाली नाही असे ते म्हणाले.
विकासाचे कोणतेही ठोस काम झाले नाही. केवळ भाषणबाजीतून विकास होत नाही. काम करणार्या पक्षाच्या मागे राहिले पाहिजे, हे आता जनतेने ओळखले आहे. महापालिका निवडणुकीत राष्ट्रवादीला निश्चितपणे मोठे यश मिळेल. युवकांना रोजगार, महिलांच्या हाताला काम देण्याबरोबरच शहराच्या सर्वांगीण विकासासाठी राष्ट्रवादी कटिबद्ध राहील असे जयंत पाटील म्हणाले.
यावेळी जिल्हाध्यक्ष (शहर) संजय बजाज, खादी ग्रामोद्योग महामंडळाचे माजी अध्यक्ष सुरेश पाटील, राष्ट्रवादीचे सांगली विधानसभा क्षेत्र अध्यक्ष कमलाकर पाटील, श्रीनिवास पाटील, प्रा. पद्माकर जगदाळे, शेडजी मोहिते, विष्णू माने, विनया पाठक, सर्जे, धनंजय पाटील, खांडेकर उपस्थित होते.