पंढरपूर : राज्यभर झालेल्या परतीच्या पावसाचा सर्वात मोठा फटका यंदाच्या कार्तिकी यात्रेला बसला असून यात्रेकरूंच्या संख्येत निम्म्याने घट झाल्याचे दिसून आले आहे.
भाविकांच्या निवासासाठी प्रशासनाच्या 65 एकरावरील भक्तिसागर या निवासतळावरील निम्मे प्लॉट मोकळे पडल्याने यात्राकाळात कायम गजबजलेला हा भक्तिसागर परिसर सुनासुना झाला आहे.
राज्यभर यंदा परतीच्या पावसाने हजारो शेतकर्यांचे मोठे नुकसान झाले आहे. यानंतर या नुकसानीचे पंचनामे अद्यापही सुरूच असल्याने आर्थिक अडचणीत सापडलेल्या शेतकर्याने यंदा कार्तिकी वारीकडे पाठ फिरवली आहे. आज कार्तिक शुद्ध दशमी असूनही शहरातील सर्वच रस्त्यांवर फारशी वर्दळ नाही. ज्या भक्तिसागरमध्ये जवळपास तीन लाखापेक्षा जास्त भाविक दरवर्षी निवास करतात तिथे केवळ 1 लाख 68 हजार भाविकांच्या निवासाची नोंद झाली आहे.
दिवाळीच्या सुट्टीत रोज हजारोंच्या संख्येने भाविकांनी गर्दी केल्याने यंदा दोन वर्षानंतर निर्बंधमुक्त वातावरणात होणारी यात्रा विक्रमी होणार अशी अपेक्षा होती. पण परतीच्या पावसाने वारकर्यांनी कार्तिकी यात्रेकडे पाठ फिरवल्याने व्यापार्यांना देखील मोठा फटका बसणार आहे. उजनीतून सोडण्यात येणारे पाणी बंद झाले असून यामुळे चंद्रभागेच्या पाणीपातळी पुन्हा सर्वसामान्य झाली आहे.
Edited by: Ratnadeep Ranshoor