Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

कोल्हापूर : दुर्दैवी! सापावर पाय पडल्याची भीती, लेकाराचा घाबरुन ताप आल्याने मृत्यू

child death
, मंगळवार, 19 सप्टेंबर 2023 (07:52 IST)
कोल्हापूर : जिल्ह्यातुन एक दुर्दैवी घटना समोर आली आहे. येथील करवीर तालुक्यातील वाकरेत शाळेतून घरी येत असताना सापावर पाय पडल्याच्या भीतीने आजारी पडून ताप मेंदूपर्यंत गेल्याने चिमुरड्याचा दुर्दैवी अंत झाल्याची धक्कादायक घटना घडली.
 
याबद्दल मिळालेली अधिक माहिती अशी की, अर्णव नवनाथ चौगले (वय 8 वर्षे) असे त्या चिमुरड्या मुलाचे नाव आहे. तो इंग्रजी माध्यमात दुसरीच्या वर्गात शिकत होता. केवळ सापावर पाय पडल्याच्या भीतीने लहान लेकराचा अशा पद्धतीने शेवट झाल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. रविवारी (17 सप्टेंबर) सायंकाळी ही घटना घडली.
 
अर्णव चार दिवसांपूर्वी नेहमीप्रमाणे शाळेतून घरी येत होता. यावेळी त्याचा सापावर पाय पडला होता. त्यामुळे घाबरलेल्या अर्णवने घरी आल्यानंतर आई वडिलांनी वाटेत झालेला प्रकार सांगितला. आई वडिलांनी तातडीने पाहिले असता त्याच्या पायावर कोणत्याही प्रकारचा ओरखडा किंवा दात वगैरे नव्हते. त्यामुळे कुटुंबीयांची मनातील काहूर दूर झाले होते.
 
मात्र, अर्णव सापावर पाय पडल्याच्या भीतीने प्रचंड घाबरुन गेला होता. परिणामी त्याला ताप भरला. ताप भरल्याने कुटुंबीयांनी त्याला उपचारासाठी सीपीआरमध्ये दाखल केले. मात्र, संर्पदंशाची कोणतीही लक्षणे दिसत नाही आणि तापही कमी येत नसल्याने त्याला उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, चिमुरडा अर्णव अत्यवस्थ झाला. त्याच्यावर उपचार सुरु असतानाच रविवारी सायंकाळी त्याचा दुर्दैवी अंत झाला. केवळ सापावर पाय पडल्याच्या भीतीने लहान लेकराचा अशा पद्धतीने शेवट झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे.

Edited By - Ratnadeep Ranshoor

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून गणेश भक्तांना गणेशोत्सवाच्या शुभेच्छा