महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीनंतर होणाऱ्या विधानसभा निवडणुकीची जय्य्त तयारी सुरु झाली असून लोकसभा निवडणुकीत विजयानंतर शनिवारी महाविकास आघाडीने संयुक्त पत्रकार परिषद घेतली. या मध्ये महाविकास आघाडीने राज्यात होणाऱ्या निवडणुका लढवणार असल्याचे जाहीर केले. तसेच या पत्रकार परिषेदेतून महाविकास आघाडीने एनडीए आघाडीवर निशाणा साधला
या पत्रकार परिषदेतून राष्ट्रवादी शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवारांनी पंतप्रधान मोदींचे आभार मानले. ते म्हणाले, मोदींनी ज्या ठिकाणी रोड शो आणि सभा घेतल्या त्या ठिकाणी महाविकास आघाडीचा विजय झाला आहे. म्हणून मी पंतप्रधानांचे आभार मानतो. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील त्यांनी सभा घ्याव्यात जेणे करून महाविकास आघाडीची स्पष्ट बहुमताकडे वाटचाल सुरु राहील.
शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे म्हणले, भाजपविरोधात कोणीही लढू शकत नाही असं त्यानां वाटायचं पण महाराष्ट्राच्या जनतेने त्यांना आरसा दाखवला आहे. आम्ही महाराष्ट्रातील जनतेचे ऋणी आहोत. हा लढा संविधान आणि लोकशाही वाचवण्यासाठी होता. हे एनडीए सरकार किती दिवस चालणार या बाबत शंका आहे. यंदा विधानसभा निवडणूक आम्ही एकत्र लढवणार आहोत. असे जाहीर केले.
उद्धव ठाकरे म्हणाले, मोदींच्या हमीचं काय झालं मंगळसूत्र, नोकरी, घर, कसले आख्यान त्यांनी तयार केले. त्यांनी खोट्या कथांवर बोलू नये. अच्छे दिन येणार आहेत, त्यांचे काय झाले, मोदींच्या हमीभावाचे काय झाले. भाजपनेच 400 चा नारा दिला होता, अच्छे दिनच्या कथनाचे काय झाले, मोदींच्या आश्वासनाचे काय झाले.सर्व जाती-धर्माच्या लोकांनी आम्हाला मतदान केले आहे. महायुतीचा मुख्यमंत्री चेहरा कोण होणार? त्याचा चेहरा काय आहे, हे जनतेच्या समोर आला आहे. त्यांची अवस्था गंभीर आहे.
या परिषदेत काँग्रेसचे नेते पृथ्वीराज चव्हाण देखील उपस्थित होते. ते म्हणाले, महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आम्ही सर्व एकत्र आलो आहेत. महाराष्ट्रातील जनतेने एमव्हीएच्या उमेदवारांना विजयी केलं आहे. येत्या विधानसभा निवडणुकीत देखील आम्हाला जनतेचे असेच प्रेम मिळेल आणि महाराष्ट्रात सत्ता परिवर्तन होईल अशी आशा बाळगतो.