Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्री सदस्यांचे मृत्यू उष्माघाताने की चेंगराचेंगरीने? हा 'सदोष मनुष्यवधाचा प्रकार' विरोधकांचा आरोप..

Members death
, बुधवार, 19 एप्रिल 2023 (19:28 IST)
facebook
सामाजिक कार्यकर्ते आप्पासाहेब धर्माधिकारी यांना रविवारी (16 एप्रिल) महाराष्ट्र शासनाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला.
 
या कार्यक्रमासाठी लाखांच्या घरात लोक उपस्थित होतो. मात्र, कार्यक्रमानंतर बाहेर पडत असताना अनेकांना उष्माघाताचा त्रास झाल्याने रुग्णालयात भरती व्हावं लागलं.
 
महाराष्ट्र शासनाने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीनुसार, या कार्यक्रमादरम्यान एकूण 14 जणांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
 
याव्यतिरिक्त एकूण 18 जणांवर उपचार सुरू असून त्यामध्ये 4 पुरुष तर 14 महिलांचा समावेश आहे. तर, एकूम 25 जणांना आतापर्यंत उपचार करून डिस्चार्ज देण्यात आल्याची माहितीही शासनाच्या प्रसिद्धीपत्रकात दिली आहे.
 
दरम्यान, संबंधित मृत्यू हे उष्माघातामुळे झाल्याचं महाराष्ट्र शासनाकडून सांगण्यात येत असलं तरी विरोधी पक्षाच्या नेत्यांनी याविषयी वेगळे आरोप केले आहे.
 
राष्ट्रवादी काँग्रेस नेते जितेंद्र आव्हाड यांनी एक ट्वीट करून महाराष्ट्र भूषण सोहळ्यात चेंगराचेंगरी झाल्याचा दावा केला आहे.
 
या चेंगराचेंगरीची जबाबदारी घेत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी विरोधकांकडून केली जात आहे.
 
नवी मुंबईतील खारघर इथे आयोजित या कार्यक्रमाला काही लाख माणसं उपस्थित होती. नवी मुंबई परिसरात आज पारा चाळीशीपल्याड गेला होता. याचा त्रास सोहळ्याला उपस्थित काही नागरिकांना झाला.
 
उष्माघाताचा त्रास झालेल्यांना तातडीनं रुग्णालयात हलवावं लागलं.
 
कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू असलेल्या श्री सदस्यांच्या तब्येतीची विचारपूस करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे 16 एप्रिलला रात्री आठच्या सुमारास पोहोचले.
 
मुख्यमंत्र्यांनी उपचार घेत असलेल्या रुग्णांशी संवाद साधला. त्याचबरोबर तेथील डॉक्टर्ससोबत चर्चा करून उपचाराबाबत माहिती घेतली.
 
मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा- संजय राऊत
दरम्यान या कार्यक्रमात झालेले मृत्यू हे उष्माघाताने झालेले नसून चेंगराचेंगरीने झाल्याचा आरोप विरोधी पक्ष नेत्यांनी केला आहे.
 
ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत म्हणाले की ‘खारघर येथे जो हल्लकल्लोळ माजला, जी चेंगराचेंगरी झाली ते पाहता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा राजीनामा घ्यायला हवा.देवेंद्र फडणवीस आज विरोधी पक्षनेते असते तर नवी मुंबई पोलीस आयुक्तालयात जाऊन त्यांनी धुडगूस घातला असता.” तसंच मृतांचा आकडा जास्त असून सरकार ते लपवत असल्याचा आरोप त्यांनी केला.
 
राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही यासंदर्भात एक व्हीडिओ ट्विट केला आहे. त्यात ही चेंगराचेंगरी कुठे झाली असा प्रश्न त्यांनी विचारला आहे.
 
“समाज माध्यमांमधून हा वीडियो आला आहे हा मोर्फ नाही कारण महाराष्ट्र शासनाची गाडी दिसते हा चेंगराचेंग्रीचा प्रकार कुठे घडला असावा?” असं आव्हाड यांनी म्हटलं.
 
'गर्दीत हृदयविकाराचा झटका'
या कार्यक्रमासाठी लोणावळ्यावरून 12 बसेस भरून भाविक आले होते. त्यापैकी एक निलेश पाठक होते.
 
त्यांच्यासोबत असलेले त्यांचे मामा कैलास दाभाडे (45) यांना हदयविकाराचा झटका आला. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
 
निलेश सांगत होते, “राजकीय नेत्यांशी आम्हाला काही घेणंदेणं नाही. पण अप्पासाहेबांसाठी आम्ही सगळे आलो होतो. राजकीय नेत्यांची भाषणं संपली. पण अप्पासाहेबांचं भाषण सुरू झालं. ते ऐकण्यासाठी सगळे वाट बघत होते. ऊन खूप वाढलं होतं. पाण्याची व्यवस्था होती पण थोडी लांब होती. अप्पासाहेबांचं भाषण संपल्यावर कार्यक्रम संपल्याचं जाहीर केलं.
 
"त्यावेळी एकाचवेळी छोट्या गेट्समधून सगळे बाहेर पडले. मामींना (कैलास दाभाडेंच्या पत्नी) देखील ऊन्हाचा त्रास होऊ लागला म्हणून त्या बाजूला जाऊन बसल्या.
 
"खूप गर्दी झाली होती. ज्यांना शक्य त्यांना घेऊन बसमध्ये गेलो. पण मामा पडले आहेत हे नंतर फोन आल्यावर कळलं. मग हॉस्पिटलला आलो. त्यांची तब्येत आता ठीक आहे. पण अजून आम्हाला भेटू देत नाहीत,” असं निलेश यांनी सांगितलं.
 
'गर्दीत पायालाही लागला मार'
ज्ञानेश्वर पाटील त्यांच्या पत्नी आणि 3 वर्षांच्या मुलीसह सॅण्डहर्स रोडहून महाराष्ट्र भूषण कार्यक्रमासाठी पहाटे 4 वाजता निघाले.
 
कुटुंबासह सकाळी 6 वाजता आंतरराष्ट्रीय कॉर्पोरेट मैदानावर पोहचले. नियोजन आणि व्यवस्थेबाबत विचारलं असता, सर्व व्यवस्था चांगली होती असं ज्ञानेश्वर पाटील सांगत होते.
 
कार्यक्रम संपल्यावर खूप गर्दी झाली होती असं पाटील सांगतात.
 
“पण कार्यक्रम संपल्यावर साधारण 1-1.30 च्या सुमारास निघताना अचानक खूप गर्दी झाली. मी सकाळी फक्त फळं खाल्ली होती. ऊनही खूप वाढलं होतं. मला चक्कर येऊ लागली.
 
"माझी मुलगी ही पत्नीकडे होती. चक्कर येत असताना पायही घसरला. मग मी पडलो. मला सावरताना माझ्या पत्नीलाही लागलं. पण आता मी बरा आहे,” असं ज्ञानेश्वर पाटील म्हणाले.
 
नरेंद्र गायकवाड ( वय 45) कार्यक्रमासाठी मुरबाडहून आले होते. कार्यक्रम संपल्यानंतर झालेल्या गर्दीमुळे नरेंद्र गायकवाड पाय घसरून पडले.
 
तेव्हा त्यांच्या डाव्या पायाला लागलं. पायाला जोरदार मार लागल्यामुळे हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.
 
राज्य शासनाने काय म्हटलं?
खारघर येथे महाराष्ट्र भूषण सोहळ्यात उष्माघाताने काही नागरिकांचा बळी गेल्याच्या प्रकरणात राज्य सरकारने याबाबत एक अहवाल जारी केला आहे.
 
या अहवालात कार्यक्रमासाठी तैनात करण्यात आलेल्या बंदोबस्ताबाबत माहिती देण्यात आलेली आहे.
 
त्यानुसार, कार्यक्रमस्थळी एकूण 2650 पाण्याच्या नळांची व्यवस्था करण्यात आली होती. त्यासाठी 7.5 किलोमीटरची पाईपलाईन टाकण्यात आली होती. येथून अखंड 24 तास पाणीपुरवठा सुरू होता, असं प्रशासनाने सांगितलं.
 
सभा संपल्यानंतरही आजूबाजूच्या परिसरातील नागरीप परत जाईपर्यंत हा पाणीपुरवठा सुरू होता, असं त्यामध्ये सांगितलं आहे.
 
याशिवाय, कार्यक्रमस्थळी एकूण 350 डॉक्टरांची सोय करण्यात आली होती. तर 150 नर्स, 150 फार्मासिस्ट, 600 मदतनीस याठिकाणी तैनात होते.
 
एकूण 80 प्रकारच्या औषधांचे 55 संच, राखीव साठा, 2 लाख 50 हजार ORS, 73 रुग्णवाहिका (54 साध्या + 19 कार्डियाक) तर आमराई येथे 4 हजार बेडची सुविधा देण्यात आली होती.
 
याशिवाय एमजीएम कामोठे, अपोलो, मेडी कव्हर, फोर्टीस आणि टाटा हॉस्पिटलही राखीव ठेवण्यात आली होती, असंही अहवालात नमूद करण्यात आलं आहे.
 
ही परिस्थिती का ओढावली?
कार्यक्रमासाठी इतक्या मोठ्या प्रमाणात वैद्यकीय नियोजन करण्यात आलं होतं, तरीसुद्धा ही परिस्थिती का ओढावली, असा प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.
 
या मुद्द्यावर राजकीय आरोप-प्रत्यारोपही होत आहेत. आकड्यांची लपवाछपवी करण्यात येत आहे का, नियोजनात कमतरता कुठे राहिली, असे प्रश्न विचारले जात आहेत.
 
या प्रकरणावरून सरकारवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा, अशी मागणी विरोधी पक्षांकडून केली जात आहे.
 
महाराष्ट्र भूषण कार्यक्रमातील 14 श्रीसदस्यांचे मृत्यू हे सरकारच्या बेजबाबदार व नियोजनशून्य कारभारामुळे झाले आहेत. प्रसार माध्यमात येत असलेल्या बातम्या पाहता हे मृत्यू घष्माघाताने झाले की चेंगराचेंगरीने हा प्रश्न निर्माण झाला आहे. हा सदोष मनुष्यवधाचा प्रकार असून शिंदे सरकार या घटनेतील सत्य लपवत आहे. खारघर घटनेवर सखोल चर्चा होणे गरजेचे असून भविष्यात अशी घटना घडू नये यासाठी विधीमंडळाचे दोन दिवसांचे विशेष अधिवेशन बोलावावे, अशी मागणी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी राज्यपाल यांना पत्र लिहून केली आहे.
Published By -Smita Joshi 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मुख्तार अन्सारीची पत्नी अफशान अन्सारी पोलिसांच्या रडारवर, 50 हजारांचे बक्षीस जाहीर