नाशिकच्या राहुड (ता. चांदवड) घाटात मध्यरात्रीच्या सुमारास नाशिककडून धुळ्याकडे औषधे घेऊन जाणाऱ्या चालत्या ट्रकमधून एक कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपये किमतीची औषधे अज्ञात चोरट्यांनी चोरून नेली. याबाबत वाहनचालक मोहमंद सलमान निसार अहमद सलमान (३०, रा. टोपरा, तहसील पूर्वा, जिल्हा उन्नाव, उत्तर प्रदेश) याने फिर्याद दिल्याने चांदवड पोलिसांत अज्ञाताविरोधात चोरीचा गुन्हा दाखल झाला आहे.
भिवंडी येथील सोनोफी नावाच्या औषध कंपनीमधून ३ ऑगस्ट रोजी वेगवेगळ्या औषधांचे ५२३ बॉक्समध्ये ५ कोटी ९७ लाख ६४ हजार ०२७ रुपये किमतीचे औषधे मुंबई येथील कुलेक्स कोल्ड चेन लिमिटेड कंपनीच्या टाटा १६१३ रेफर ट्रक (क्र. एम. एच. ०४, जे. यु. २३३९)मध्ये वाहनचालक मोहमंद सलमान निसार अहमद सलमान मुंबई-आग्रा महामार्गाने घेऊन चालला होता. पिंपळगाव बसवंत ते राहूड घाट दरम्यान अज्ञात चोरट्यांनी ट्रकचा मागील दरवाजा उघडून सुमारे १ कोटी ३९ लाख ४४ हजार ७३३ रुपयांची औषधे चोरून नेली. ट्रकचा दरवाजा उघडा असल्याचे लक्षात आल्यावर चालकाने वाहन थांबवून बघितले असता औषधे चोरीला गेल्याचे समजले. या घटनेबाबत चांदवड पोलिसांना माहिती दिली असता चांदवडच्या अधिकारी सविता गर्जे, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक हेमंत पाटील यांनी घटनास्थळी पोहोचून पंचनामा केला.
Edited By - Ratnadeep Ranshoor