Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

नाशिकच्या ‘रावण’वर ५ कोटींची बोली, विकण्यास नकार

नाशिकच्या ‘रावण’वर ५ कोटींची बोली,  विकण्यास नकार
, शुक्रवार, 24 डिसेंबर 2021 (15:54 IST)
महाराष्ट्रातील सारंगखेडा यात्रा देशभरात प्रसिद्ध आहे. या यात्रेत विविध ठिकाणांहून अनेक घोडे विक्रीसाठी येतात. या यात्रेत विकल्या जाणाऱ्या घोड्यांवर लाखो-करोडोंची बोली लागते. नुकतेच या यात्रेत महाराष्ट्रातील नाशिकचा एक घोडा मुख्य आकर्षण ठरला. ‘रावण’ नावाच्या या घोड्याचीच चर्चा सध्या सुरू आहे. चर्चेचे कारण म्हणजे, रावण नावाच्या या काळ्या घोड्यासाठी यात्रेत ५ कोटी रुपयांची बोली लागली आहे. अनेकजण या घोड्याला विकत घेण्यास तयार आहेत, पण घोड्याच्या मालकाने त्याला विकण्यास नकार दिला आहे.
 
सारंगखेडा यात्रेसाठी राज्यासह परराज्यातूनही भाविक येतात. ही यात्रा घोडे बाजारासाठी प्रसिद्ध आहे. परिसरातील व्यावसायिक यात्रेत मोठ्या जोमाने व्यवसाय थाटतात. मात्र यंदा जिल्हा प्रशासनाने यात्रा रद्द केली आहे. फक्त घोडे बाजाराला नियम व अटी शर्तींवर परवानगी दिली आहे. सध्या दोन हजार अश्व विक्रीसाठी आले आहेत. एका दिवसात ७५ घोड्यांच्या विक्रीतून ६० लाखाची उलाढाल झाली. यावर्षी हा घोडे बाजार ४ कोटीचा टप्पा पार करेल असा अंदाज व्यक्त केला जात आहे. सर्वात महाग विक्री झालेला कोहिनूरला १७ लाखांची बोली लागली होती. मात्र बाळू मामा मंदिरासाठी घोडा जात असल्याने ११ लाख ११ हजार १११ रुपयांना घोडा विक्री दिल्याचे व्यापारी बच्छाव यांनी सांगितले.
 
तीनशे वर्षापूर्वीचे मंदिर
महानुभाव संप्रदायाचे उत्तर महाराष्ट्रातील भव्य एकमुखी दत्त मंदिर येथे आहे. यात्रोत्सव काळात देशभरातील भाविक येथे दर्शनासाठी येतात. सारंगखेडा दत्त मंदिर तीनशे वर्षापूर्वीचे आहे. कोरोना काळात दीड वर्ष मंदिर बंद होते. या काळात मंदिराच्या रंगरंगोटीसह अनेक कामे करण्यात आले. मंदिराच्या गाभाऱ्यांत मोहक असे काचेचे काम करण्यात आले आहे. संप्तरंगात असलेले हे काम राजस्थानातील कारागिरांनी राजस्थानी शैलीत, मोंगल कालीन शिल्प कलेशी साधर्म साधत बनवले आहे. मंदिराची रचना गोल वास्तूशास्त्रानुसार केलेली आहे. येथे प्रतिध्वनी निर्माण होऊन तो मंदिरातील गाभाऱ्यातच लुप्त पावतो. हे एक जागृत देवस्थान म्हणून ओळखले जाते.
 
कोणत्या जातीचा आहे नाशिकचा ‘रावण’?
सारंगखेडाच्या यात्रेत आलेल्या रावणाची किंमत ५ कोटी निश्चित करण्यात आली. त्याची बोली आधी लाखांपासून सुरू झाली होती. रावण हा मारवाड जातीचा आहे. रावणचे संपूर्ण शरीर काळ्या रंगाचे असून, त्याच्या कपाळावर पांढऱ्या रंगाच टिळा आहे. त्याला देवमन, कंठ, कुकड नाळ, नगाडा पुठ्ठा अशी शुभलक्षणे असल्यामुळे घोड्याची किंमत कोट्यवधींच्या घरात असल्याचे मालक असद सयैद यांनी सांगितले. या घोड्याची लांबी ६८ इंच असून, या प्रामुख्याने प्रजननासाठी वापरला जातो.
 
रावणला दररोज १ किलो तूप, १० लिटर दूध, पाच गावरान अंडी, बाजरी आणि ड्रायफ्रूट्स लागतात. रावणाची काळजी घेण्यासाठी नेहमी दोन लोक असतात. रावणचे मालक असद सय्यद मूळ मुंबईचे आहेत. ते म्हणाले की, या घोड्याची आधी लाखात बोली लागत होती, मात्र आता ५ कोटींची बोली लागत आहे. मात्र असद सय्यद यांनी रावणला विक्री करण्यास नकार दिला आहे. त्यांनी सांगितले की, रावणला विकण्याचा त्यांचा अजून कोणताही विचार नाही. रावणला किती किंमत मिळते, हे समजण्यासाठी सारंगखेडच्या जत्रेत असल्याचे त्यांनी सांगितले. असद यांनी सांगितल्यानुसार, रावणचा खुराक आणि इतर कामांसाठी दर महिन्याला लाखो रुपयांचा खर्च होतो.महाराणा प्रताप यांचा घोडा याच जातीचा होता.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अज्ञात आजाराने अनेक मेंढ्यांचा मृत्यू