राज्यात महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यात मोठी भूमिका वठवलेले शिवसेनेचे नेते, खासदार संजय राऊत यांनी आता राष्ट्रपतिपदासाठी मोर्चेबांधणी करण्याचा कामाला लागले आहेत. 2022 मध्ये होणार्या राष्ट्रपतिपदाच्या निवडणुकीसाठी सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख शरद पवार यांच्याच नावाचा विचार करावा, असे आवाहन संजय राऊत यांनी केले आहे. 2020 साली राष्ट्रपतिपदाच्या उेदवाराचे नाव निश्चित करण्यासाठी आमच्याकडे आवश्यक तेवढे संख्याबळ असेल असा दावाही राऊत यांनी केला आहे. याबाबत लवकरच रणनीती आखली जाईल असेही राऊत म्हणाले.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांनी राज्यात महाआघाडीचे सरकार स्थापन करण्यात अत्यंत महत्त्वाची भूमिका साकारली होती. शरद पवार हे देशातील ज्येष्ठ नेते असून मला वाटते की सर्व राजकीय पक्षांनी राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून त्यांच्या नावाचा विचार करावा, असे राऊत म्हणाले.
भाजपची सत्ता नसलेल्या राज्यांमध्ये जाणार
राष्ट्रपतिपदाचे उमेदवार म्हणून पवार यांच्या नावाची मोर्चेबांधणी करण्यासाठी खासदार संजय राऊत हे लवकरच पश्चिम बंगाल, मध्य प्रदेश, राजस्थान आणि केरळ राज्यांचा दौरा करणार आहेत. या दौर्यादरम्यान ते त्या त्या राज्याच्या मुख्यमंत्र्यांची भेट घेऊन पवार यांच्या उमेदवारीबाबत चर्चा करणार आहेत. राष्ट्रपतिपदाच्या उमेदवारीबाबत शरद पवार यांच्याशी चर्चा करून एक व्यापक अशी योजना तयार केली जाईल असे राऊत म्हणाले. शरद पवार यांच्या नावाला कुणी विरोध करणार नाही, अशा विश्वासही राऊत यांनी व्यक्त केला आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार हे देशातील सर्वात ज्येष्ठ नेते आहे आणि म्हणूनच त्यांचा सन्मान झालाच पाहिजे, असे राऊत म्हणाले. पवार यांचा प्रशासकीय अनुभव आणि राजकीय कुशाग्रता पाहता त्यांना भारताचा घटनात्मक प्रुखपदावर बसवणे योग्य ठरेल, असेही राऊत म्हणाले. महाराष्ट्र विकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यामध्ये पवार यांचे मोठे योगदान असल्याने पवार यांच्याप्रती राऊत यांची नैतिक जबाबदारी आहेच, असे राजकीय अभ्यासकांचे मत आहे.