Publish Date: Thu, 17 Nov 2016 (17:03 IST)
Updated Date: Thu, 17 Nov 2016 (17:06 IST)
निफाड पोलिसांनी केलेल्या नाकाबंदीत दोन कारमध्ये ७३ लाख रुपयांची चलनातून बाद झालेली रोकड जप्त केली आहे. या प्रकरणात नाकाबंदी सुरू असतांना निफाड येथील शांतीनगर चौफुलीवर प्रत्येक वाहनांची तपासणी सुरु होती. यावेळी नाशिकहून कोपरगावकडे जाणार्या (एम.एच. १७ ए. झेड ३५७१) करोला अल्टीस या कारच्या झडतीत ३२ लाख ९९ हजार ५०० रुपये तर गुजरातकडून वैजापूरकडे जाणार्या एर्टिगा (एम.एच. २० सी.एस. ९७१९) कारमध्ये ४० लाख रुपये झडतीत मिळून आले. दोन्ही कारमध्ये ७२ लाख ९९ हजार ५०० रुपये आढळले. या सर्व नोटा सध्या चलनातून रद्द केलेल्या १००० आणि ५०० रुपयांच्या आहेत. पोलिसांनी हस्तगत केलेल्या या नोटा मोजण्यासाठी येथीलच बँक ऑफ हैदराबाद शाखेच्या व्यवस्थापकास मशीनसह बोलवण्यात आले. त्यांनी सदर रकमेची मोजणी केल्यानंतर त्याचा पंचनामा करण्यात आला असून याबाबत निफाड पोलिसांनी आयकर विभागाला कळवले.
सदरची कारवाई निफाडचे पोलीस निरीक्षक रणजित डेरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक एस.व्ही. गिरी, ए. एस. गांगुर्डे, एस. सी. वाघ, के. डी. निंबेकर, त्र्यंबक पारधे, विलास बिडगर, महाजन, मनोज आहेर आदी सहभागी झाले होते.