सध्या मान्सूनने राज्याला व्यापले आहे. हवामान खात्यानुसार दक्षिण गुजरातवर हवेच्या वरच्या स्तरावर वाऱ्याची चक्रीय स्थिती निर्माण झाल्यामुळे किनारपट्टी आणि पश्चिम घाटाच्या परिसरात पुढील तीन दिवस पाऊस कोसळणार आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात मेघगर्जनेसह पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. राज्यातील सिंधुदुर्ग, रायगड, कोल्हापूर, रत्नागिरी, पुणे, सातारा या जिल्ह्याना हवामान खात्यानं ऑरेंज अलर्ट जारी केला आहे.
महाराष्ट्रापासून केरळच्या किनारपट्टीवर हवेची द्रोणीय रेषा निर्माण झाली असून बंगालच्या किनारपट्टीवर हवेच्या कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले असून हवामानविषयक पावसासाठी पोषक स्थिती निर्माण झाली आहे.मुंबई शहर, विदर्भ, मुंबई उपनगर, ठाणे, नाशिक, पालघर, नंदुरबार, धुळे, या ठिकाणी यलो अलर्ट जाहीर केले आहे.
राज्यातील किनारपट्टी आणि पश्चिम घाट परिसरात पुढील तीन दिवस पावसाचा जोर वाढण्याची शक्यता आहे. तर उत्तर महाराष्ट्र आणि विदर्भात पूर्व मोसमी पाऊस मेघगर्जनेसह ताशी 30 ते 40 किमी वेगाने वाऱ्यासह हलक्या ते मध्यम स्वरूपाचा पाऊस होण्याची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.