ज्ञानोबा माऊली-तुकारामअसा नामघोष, टाळ-मृदंगाच्या तालावर होणारा विठूनामाचा गजर… तुळशी वृंदावन आणि दिंड्या-पताका… अशा भक्तिमय वातावरणात आषाढी वारीसाठी श्री संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याने शनिवारी (दहा जून) दुपारी दोन वाजता प्रस्थान होणार आहे. त्यासाठी तयारी पूर्ण झाली असून, भाविकांच्या स्वागतासाठी देहूकर सज्ज झाले आहेत.
300 वर्षांपासून महाराष्ट्राला वारीची परंपरा आहे. लाखो वारकरी दरवर्षी मोठ्या संख्येनं या वारीत सहभागी होतात. ऊन, वारा, पाऊस अंगावर घेत विठुरायाच्या दर्शनाला पायी चालत जातात.अनेक गावात वारीचा मुक्काम असतो. यादरम्यान अनेक गावांमध्ये वारीचं दर्शन घेण्यासाठी भाविक गर्दी करतात. या सगळ्या वारकऱ्यांना आता आषाढी वारीची आस लागली आहे.
याच पार्श्वभूमीवर आज देहूच्या संत तुकाराम महाराज यांच्या पालखीचं प्रस्थान होणार आहे तर 11 जूनला संत ज्ञानेश्वर महाराज यांच्या पालखीचं आळंदीतून प्रस्थान होणार आहे. दरम्यान जसंजसं तंत्रज्ञान वाढत आहे तसंतसं वारीला देखील परंपरेसोबतच तंत्रज्ञानाची जोड लागताना दिसत आहे.
दरम्यान विठुरायाची आस लागलेला वारकरी संप्रदाय आता देहू नगरीत दाखल होऊ लागले आहेत. संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थानात आणि पायी वारीत हा वारकरी सहभागी होणार आहे. प्रस्थानाला काही तास उरले असतानाच देहू नगरीत वैष्णवांचा मेळा रंगू लागला आहे. पावसाने ओढ दिल्यामुळं पेरणी न झाल्याची खंत या वारकऱ्यांच्या मनात आहे. मात्र विठुरायाच्या चरणी माथा टेकल्यावर ती खंत दूर होईल आणि बळीराजा नक्की सुखावेल, अशी आशा घेऊन आषाढी सोहळ्यात दाखल झालेल्या वारकऱ्यांनी व्यक्त केली आहे.
तर विठुरायाच्या चरणी माथा टेकवण्यासाठी वारकरी अडीचशे किलोमीटरची पायपीट करतो. तरी त्यांच्या चेहऱ्यावर थकवा जाणवत नाही. कारण टाळ-मृदंगाचा ताल या वारकऱ्यांचा थकवा दूर करत असतो. त्याच टाळ मृदुगाच्या डागडुजीची लगबग सध्या देहू-आळंदीत पाहायला मिळत आहे.