केंद्रीय मंत्री नारायण राणेंच्या अटकेनंतर भाजपा नेत्यांनी आक्रमक पवित्रा घेतला आहे. भाजपा नेते प्रसाद लाड यांनी महाविकास आघाडीवर टीकेचे बाण सोडले आहेत. जाणीवपूर्वक कोणतीही कलमं नसताना राणेंना अटक केल्याचा आरोप त्यांनी केली आहे.
“ही अटक निषेधार्ह आहे. नारायण राणे हे लोकप्रतिनिधी आहेत. खासदार आहेत. केंद्रात मंत्री आहेत. माजी मुख्यमंत्री आहे. राणे साहेब जेवत असताना पोलिसांनी धक्काबुक्की केली. त्यांना खेचलं. त्यांच्या हातात जेवणाचं ताट होतं. त्याचा व्हिडिओ मी काढलेला आहे. केंद्रातील कॅबिनेट मंत्र्यासोबत राज्य सरकारनं जे वर्तन केलं, ते चुकीचं आहे. राणे साहेबांना गाडीत बसवलं आहे. त्यांना कोणत्या कलमाखाली अटक करण्यात येईल याची देखील कल्पना नाही. एसपी बोलायला तयार नाहीत. दरवाजा बंद करून बसले आहेत. आम्हाला अशी भीती आहे की, राणे साहेबांच्या जीवाला धोका आहे. राणे साहेबांना सहा वाजेपर्यंत असंच ताटकळत ठेवून कोर्टापुढे न नेता त्यांना रात्रभर तुरुंगात ठेवून रात्रभर छळवाद करण्याचा सरकारचा प्रयत्न असू शकतो.”, असं भाजपा नेते प्रसाद लाड यांनी सांगितलं.