राज्यात देशविरोधी कट शिजत आहे असे विधान करणारे मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी याबाबतचे पुरावे द्यावेत, असे आवाहन राज्याचे गृहराज्यमंत्री सतेज पाटील यांनी येथे केले.
मुंबई येथे नसेचे पहिले राज्यव्यापी अधिवेशन पार पडले. यावेळी राज ठाकरे यांनी 'राज्यासह देशाच्या काही भागांमध्ये देशविरोधी कट शिजत आहे. याची माहिती मी लवकरच मुख्यमंत्री आणि केंद्रीय गृहमंत्र्यांना भेट घेऊन देणार आहे,' असे विधान केले होते.
याबाबत कोल्हापूर येथे पत्रकारांनी गृहराज्यमंत्री पाटील यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, ' अशापद्धतीची माहिती गृह विभागाकडे वर्षभर येत असते. तेव्हा त्याची योग्य ती दक्षता पोलीस प्रशासन घेत असते. अशाप्रकारे काही घटना घडत असल्याचे राज यांना माहीत असेल तर त्यांनी या संदर्भातील पुरावे राज्याचे पोलीस महासंचालक यांच्याकडे द्यावेत. जेणेकरून त्याची दखल घेऊन योग्य ती काळजी घेता येईल.'
'काही विशिष्ट भागात मौलवींचा वावर वाढला असून तो काळजी वाढवणारा आहे,' असेही विधान ठाकरे यांनी केले होते. च्याचा राज्यमंत्री पाटील यांनी इन्कार केला. ते म्हणाले, लोकसभा निवडणुकीनंतर राज ठाकरे यांची राजकी भूमिका बदललेली आहे. त्याला अनुसरून ते विधान करीत आहेत. अशा प्रकारची विधाने करण्यापेक्षा त्यांनी पुरावे दिल्यास उचित कार्यवाही करता येईल, असेही पाटील यांनी स्पष्ट केले.